उद्या २१.७.२०२४ (आषाढ पौर्णिमा) या दिवशी सनातनच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता महादेव पाटील यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने रुग्णालयात भरती झाल्यानंतर त्यांनी गुरूंची कृपा कशी अनुभवली ? ते येथे दिले आहे.
पू. (सौ.) संगीता पाटील यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. ‘वर्ष २०२३ मध्ये मी आजारी पडले. तेव्हा मला रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात गेल्यावर ‘एम्.आर्.आय्.’ काढायच्या वेळी मला पुष्कळ भीती वाटत होती. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर मला गुरुदेवांचे छायाचित्र दिसले. गुरुस्मरण करून ‘एम्.आर्.आय्.’ काढला. तेव्हा तो सर्वसाधारण आला.
टीप – ‘एम्.आर्.आय्. (Magnetic Resonance Imaging)’ : रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान.
२. मी झोपल्यानंतर तेथील आधुनिक वैद्यांनी मला पांघरूण घातले. तेव्हा ‘ते पिवळे चैतन्यमय पांघरूण गुरुदेवांनी मला घातले’, असे मला वाटले. आधुनिक वैद्य माझी विचारपूस करत असतांना माझ्याशी पुष्कळ प्रेमाने बोलत होते. ‘त्यांच्या माध्यमातून गुरुदेवच माझी विचारपूस करत आहेत’, असे मला वाटले.
३. मला ‘रुग्णालयाचे देयक किती येणार ?’, अशी भीती वाटत होती; पण प्रत्यक्षात रुग्णालयाने केवळ ‘एम्.आर्.आय्.’चे पैसे घेतले. ‘गुरुदेवच सर्व प्रकारच्या अडचणींतून बाहेर काढतात’, हे मला अनुभवता आले.’
– (पू.) सौ. संगीता महादेव पाटील, भोसरी, जिल्हा पुणे. (१४.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |