पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे पालकांना आवाहन !
पुणे – आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शहर आणि जिल्ह्यातील पालकांची धडपड चालू असते. त्यातून त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील मिळून ४९ अनधिकृत शाळांची सूची १० जुलै या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचीतील शाळांमध्ये पालकांनी स्वत:च्या पाल्याला प्रवेश न घेण्याचे आवाहनही केले आहे.
या अनधिकृत शाळांमध्ये पुणे शहरातील १४, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ आणि पिंपरी-चिंचवडमधील ११ शाळांचा समावेश आहे. शहर आणि जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा शोध घेण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी अन् जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकार्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवली होती. या मोहिमेत अनधिकृत आढळून आलेल्या शाळांची सूची घोषित करण्यात आल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी सांगितले आहे.