Miracle Complaint Against Christian Preacher : तेलंगाणामध्‍ये चमत्‍कार करून मुलीला बरे करण्‍याचा दावा करणार्‍या ख्रिस्‍ती धर्मप्रचारकाच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट !

चिमुरडीला चमत्‍काराच्‍या नावाखाली क्रूर वागणूक

भाग्‍यनगर – येथे एका ख्रिस्‍ती धर्मप्रचारकाने चमत्‍कार दाखवत मूत्रपिंड निकामी झालेल्‍या मुलीला बरे केल्‍याचा दावा केला आहे. या चिमुरडीला चमत्‍काराच्‍या नावाखाली क्रूर वागणूक देण्‍यात आली. एका गंभीर आजारी मुलीला मंचावर चालण्‍यास भाग पाडले गेले आणि हा एक चमत्‍कार असल्‍याचे म्‍हटले गेले. या प्रकरणी ख्रिस्‍ती धर्मप्रचारकाच्‍या  विरोधात तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. (असा दावा एखाद्या हिंदु व्‍यक्‍तीने केला असता, तर साम्‍यवादी प्रसारमाध्‍यमे आणि सेक्‍युलरवादी हिंदु व्‍यक्‍तीवर तुटून पडले असते आणि हिंदु धर्माला अपकीर्त करण्‍यासाठी ही घटना राष्‍ट्रीय स्‍तरावरच नाही, तर आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर ‘ब्रेकिंग न्‍यूज’ म्‍हणून प्रसारित केली असती ! – संपादक)

१. ख्रिस्‍ती धर्मप्रचारक प्रवीण कुमार याने काही दिवसांपूर्वी ‘यू ट्यूब चॅनल’वर एक व्‍हिडिओ प्रसारित केला होता. यामध्‍ये  पीडित मुलीच्‍या आईने सांगितले की, तिच्‍या मुलीचे मूत्रपिंड निकामी झाले आहे. तिची मुलगी गेल्‍या ३ दिवसांपासून भाग्‍यनगरमधील ‘निलोफर हॉस्‍पिटल’च्‍या अतीदक्षता विभागात भरती होती.

२. महिलेने सांगितले की, मुलीचा जीव वाचवण्‍यासाठी तिने मुलीला कलवरी चर्चच्‍या चमत्‍कारिक उपचार कार्यक्रमाला आणले. महिलेच्‍या म्‍हणण्‍यानुसार मूत्रपिंड निकामी झाल्‍यामुळे मुलगी हालचाल करू शकत नव्‍हती; पण आता ती चालू शकते.

३. व्‍हिडिओ प्रसारित झाल्‍यानंतर ३ जुलै २०२४ या दिवशी ‘एल्.आर्.पी.एफ्.’ नावाच्‍या संघटनेने मूत्रपिंड निकामी झालेल्‍या मुलीला क्रूर वागणूक दिल्‍याच्‍या प्रकरणी ख्रिस्‍ती धर्मप्रचारकाच्‍या  विरोधात तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

४. तक्रारीत म्‍हटले आहे की, व्‍हिडिओवरून हेही स्‍पष्‍ट झाले आहे की, ख्रिस्‍ती धर्मप्रचारकाने कार्यक्रमाच्‍या वेळी मुलीवर क्रूरपणे अत्‍याचार केले. तसेच त्‍याविषयीचा एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमावर प्रसारित करून मुलीच्‍या प्रतिष्‍ठेला आणि गोपनीयतेला हानी पोचवणारी कृती केली आहे.

५. वर्ष २०१९ मध्‍ये अशाच एका प्रकरणात ख्रिस्‍ती धर्मप्रचारका प्रवीण कुमार आणि त्‍याची पत्नी शेरॉन यांच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता.

संपादकीय भूमिका

हिंदु संतांना ‘भोंदू’ म्‍हणून हिणवणारे आणि त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍याची मागणी करणारे अंनिसवाले आणि बुद्धीप्रामाण्‍यवादी अशा वेळी कोणत्‍या बिळात लपून बसतात ?