सातारा, ४ जुलै (वार्ता.) – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील ६४० एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार होती. या सुनावणीला गुजरात राज्याचे मुख्य सेवा आणि कर (जी.एस्.टी.) आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते; मात्र अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे हे मंत्रालयातील एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे पुढील सुनावणी ११ जुलै या दिवशी होणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील ६४० एकर जमीन स्थानिक शेतकर्यांना फसवून आयुक्त वळवी आणि त्यांचे नातेवाईक यांनी घेतली आहे, अशा अनेक तक्रारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आयुक्त वळवी आणि त्यांचे नातेवाईक यांना अपर जिल्हाधिकारी यांनी नोटिसा पाठवल्या होत्या. त्यानुसार आयुक्त वळवी आणि त्यांचे नातेवाईक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित झाले होते.
प्रसिद्धीमाध्यमांना प्रतिक्रिया देतांना आयुक्त वळवी म्हणाले, ‘‘मी शासकीय प्रक्रियेचे पूर्णपणे पालन करणार असून शासनाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे.’’