‘वारकरी सेवा रथा’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन !

मुंबई, ३० जून (वार्ता.) – विधीमंडळात २८ जून या दिवशी महायुती सरकारचा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. त्यात पंढरपूरच्या वारीला जाणार्‍या मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रतिदिंडी २० सहस्र रुपयांचा निधी देण्याच्या घोषणेचा समावेश आहे, तसेच ‘निर्मल वारी’साठी निधी अन् मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू – आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकर्‍यांची आरोग्य पडताळणी, विनामूल्य औषधोपचार करण्याची घोषणा करण्यात आली. यानिमित्ताने वारकर्‍यांच्या वतीने विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘वारकरी सेवा रथा’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांना विठ्ठलाची मूर्ती देऊन वारकर्‍यांनी त्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात स्वच्छ आणि निर्मल वारी झाली पाहिजे, यासाठी सरकारकडून सर्व दक्षता घेण्यात येणार आहे. वारकर्‍यांसाठी फिरते शौचालय आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय राज्यशासनाकडून देण्यात येईल. या कार्यक्रमाला वारकरी ह.भ.प. अक्षय महाराज भोसले (प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना), शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, योगेश केदार यांच्यासह अनेक वारकरी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.