भाजपचे आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी
मुंबई, ३० जून (वार्ता.) – ‘राज्यात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याच्या घटना घडत आहेत. अशी कृत्ये केल्यानंतर त्याविषयीचे ‘स्टेटस’ (सामाजिक माध्यमांवरील स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण.) ठेवले जात आहेत. कोणताही शिवप्रेमी आणि हिंदु बांधव हे कदापि सहन करणार नाही. राज्यशासनाने याची गंभीर नोंद घेऊन महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणार्यांच्या विरोधात विधीमंडळात कायदा आणावा’, अशी आग्रही मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी २९ जून या दिवशी विधानसभेत केली. औचित्याच्या सूत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली.
नितेश राणे म्हणाले, ‘‘पुणे येथील हडपसरमध्ये एका जिहादी विचाराच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगडफेक केली. पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे २८ जून या दिवशी तेथे मोठ्या प्रमाणावर राज्यातील अनेक भागांमध्ये शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे लोक रस्त्यावर उतरले. त्यांची सरकारकडे एकच मागणी आहे की, महापुरुषांची विटंबना करणार्यांविरोधात कायदा आणावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा अन्य कुठलेही महापुरुष, त्यांच्याकडे वाकड्या दृष्टीने पहाणार्या जिहादी विचारांच्या विरोधात सरकारने कठोर पावले उचलावीत.’’