वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या दुसर्या दिवशीचे दुसरे सत्र
नेपाळमधील समाजिक संस्था आणि राजकारणी विदेशी लोकांचे गुलाम ! – शंकर खराल, वरिष्ठ उपाध्यक्ष, विश्व हिंदु महासंघ, नेपाळ
विद्याधिराज सभागृह – नेपाळ बहुसंख्य सनातनी हिंदूंचा देश आहे. तेथील राष्ट्रध्वज आणि दिनदर्शिका दोन्ही सनातनी आहेत. प्राचीन काळी भारतातील ऋषि-मुनी नेपाळमध्ये तपस्या करण्यासाठी येत होते. त्यामुळे नेपाळ ही एक तपोभूमी आहे. या तपोभूमीत निश्चितपणे हिंदु राष्ट्र येईल. त्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांनी एक घोषणापत्र काढून नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करावी, असे प्रतिपादन नेपाळ येथील विश्व हिंदु महासंघाचे वरिष्ठ अध्यक्ष श्री. शंकर खराला यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त द्वीतीय दिवशी केले. ते ‘नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी राबवण्यात येणारी मोहीम, त्याला मिळणारा प्रतिसाद आणि त्या समोरील आव्हाने’ या विषयावर बोलत होते.
श्री. खराल म्हणाले, ‘‘नेपाळवर आजही भारताचा पुष्कळ प्रभाव आहे. भारतात ‘भारत’ आणि ‘इंडिया’ अशा दोन विचारसरणी आहेत. भारताला वाटते की, नेपाळ आणि भारत यांच्यात मैत्रीचे संबंध असावेत; पण ‘इंडिया’ला तसे व्हावे, असे वाटत नाही. नेपाळमध्ये समाजिक संस्था आणि राजकारणी मोठ्या प्रमाणात विदेशी देणग्या स्वीकारतात. त्यामुळे ते विदेशी शक्तींचे गुलाम बनले आहेत. त्यांचा सत्तेमध्ये अधिक सहभाग असल्याने नेपाळमधील लोकशाही निधर्मी आहे. नेपाळमध्ये आदिवासींना आधी बौद्ध करण्यात येते. त्यानंतर त्यांचे ख्रिस्ती पंथात धर्मांतर करण्यात येते.’’
लँड जिहाद रोखण्यासाठी ‘वक्फ बोर्ड’ विसर्जित करा ! – प्रशांत कोतवाल, राष्ट्रीय संघटनमंत्री, भारत रक्षा मंच
रामनाथी देवस्थान – आसाममधील मुसलमान घुसखोरांची समस्या बंगालची फाळणी झाली, तेव्हापासूनची आहे. त्याकाळी ब्रिटिशंनी बंगालची धर्मावर आधारित फाळणी केली. तेव्हापासून मुसलमानबहुल पूर्व बंगालमधून मुसलमानांची आसाममध्ये घुसखोरी चालू झाली. नंतर वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. तेव्हापासून बांगलादेशी मुसलमानांना आसाममध्ये घुसवले जाऊ लागले. सध्या ८ ते १० कोटी बांगलादेशी मुसलमान भारताच्या विविध राज्यांमध्ये वास्तव्य करत आहेत. कुठल्याही युद्धाविना मुसलमानांनी देशाचा मोठा भाग कह्यात घेतला आहे. ही भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या नियंत्रणात आहे. हा एकप्रकारचा ‘लँड जिहाद’ आहे. ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी ‘वक्फ बोर्ड’ विसर्जित करणे आवश्यक आहे, असे मत भारत रक्षा मंचाचे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. प्रशांत कोतवाल यांनी व्यक्त केले. ते ‘बांगलादेशींची घुसखोरी रोखण्यासाठी भारत रक्षा मंच करत असलेले कार्य’ या विषयावर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे; मात्र त्याचा अद्याप अपेक्षित लाभ होतांना दिसलेला नाही. देशभर ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ लागू केला पाहिजे. देशातील मठ-मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त झाली पाहिजेत. त्यासाठी हिंदूंचा दबावगट निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी हिंदु समाजाचे सशक्तीकरण आणि संघटन करणे आवश्यक आहे.
धर्महानी करणार्या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वर अंकुश ठेवणारे परिनिरीक्षण मंडळ आवश्यक ! – ज्योत्सना गर्ग, महासचिव, ‘नेशन फर्स्ट कलेक्टिव्ह’
(ओटीटी मंचावरून दर्शक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पहातात.)
विद्याधिराज सभागृह – चित्रपटांसाठी ‘चित्रपट परिनिरीक्षण मंडळ’(सेंसॉर बोर्ड) असल्याने समाजासाठी हानीकारक असलेल्या चित्रपटांवर अंकुश ठेवता येतो. त्याप्रमाणे ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’साठी कोणतेही ‘परिनिरीक्षण मंडळ’ नसल्याने त्याद्वारे मोठ्या प्रमाणात हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विरोधातील गोष्टी प्रसारित होत असतात. अशा ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वर अंकुश ठेवण्यासाठी ‘परिनिरीक्षण मंडळ’ स्थापन करावे, अशी मागणी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारकडे करावी, असे प्रतिपादन ‘नेशन फर्स्ट कलेक्टिव्ह’च्या महासचिव (सुश्री) ज्योत्सना गर्ग यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्या दिवशी केले. ‘चित्रपटांतून दाखवण्यात येणार्या हिंदुविरोधी प्रसंगांना रोखण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न’ या विषयावर बोलत होत्या.
ज्योत्सना गर्ग या ‘चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’च्या सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत. त्यांनी त्यांच्या स्तरावर देश, हिंदु धर्म आणि संस्कृती यांची विटंबना करणार्या विविध चित्रपटांना विरोध केला आहे. त्यामुळे काही चित्रपट प्रसारित होऊ शकले नाहीत, तर काही चित्रपटातील विटंबनात्मक भाग वगळण्यात आला आहे. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्या यांचा समाजावर सखोल प्रभाव पडतो. भारतात चित्रपट बनवण्यासाठी विदेशी संस्थांकडून आर्थिक साहाय्य मिळते. त्यांना हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करायची असल्याने ते धर्म-संकृतीविरोधी चित्रपटांना अधिक प्रमाणात आर्थिक साहाय्य करतात. अशा चित्रपटांना सर्वांनी संघटित होऊन विरोध करणे आवश्यक आहे. यासमवेतच हिंदूंनी त्यांच्या घरातील मुलांवर ‘सेंसॉर’ (अंकुश) ठेवणे आवश्यक आहे. मुले भ्रमणभाषवर काय पहातात, याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांवर लहानपणापासून धार्मिक संस्कार केले, तर ते लव्ह जिहाद किंवा धर्मांतर यांना बळी पडणार नाहीत, तसेच आपल्या मुलांना धर्म, संस्कृती आणि मंदिरे यांच्याशी जोडले पाहिजे. त्यामुळे हिंदूंच्या अर्ध्या समस्या संपतील.’’
येत्या कुंभमेळ्यात येणार्या प्रत्येक भाविकापर्यंत हिंदु राष्ट्राचा विचार पोचवूया ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
विद्याधिराज सभागृह – १४ जानेवारी २०२५ पासून प्रयागराज येथे कुंभमेळ्याला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्याला ४० कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. या प्रत्येक भाविकापर्यंत हिंदु राष्ट्राचा विचार पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या धर्मकार्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी वेळ द्यावा. हिंदूंचा विश्वातील हा सर्वांत मोठा धार्मिक मेळावा आहे. कुंभमेळ्यामध्ये उपस्थित रहाणार्यांचे संघटन करणे, व्याख्यानांचे आयोजन करणे, मंदिराच्या विश्वस्तांशी हिंदु राष्ट्राविषयी संवाद साधणे, कुंभमेळ्यात सहभागी होणार्या १० सहस्रांहून अधिक आध्यात्मिक संस्थापर्यंत लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र यांचा धोका, हिंदु राष्ट्राच्या आवश्यकतेचा विचार यांची माहिती देणे, यासाठी प्रयत्न करणार आहोत. समविचारी संतांच्या बैठकांचे आयोजन करून समानसूत्री कार्यक्रम निश्चित केले जाणार आहेत. सर्व हिंदु संघटनांच्या साहाय्याने हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे. धर्मप्रेमींनी कुंभमेळ्यात सहभागी होऊन या धर्मप्रसाराच्या कार्यासाठी वेळ द्यावा. ज्यांना वेळ देणे शक्य नाही, त्यांनी निवासव्यवस्था, भोजन, प्रसारसाहित्याची छपाई, विद्युत् साहित्य, वैद्यकीय साहित्य आदींसाठी आर्थिक साहाय्य करून धर्मकार्यात सहभागी होता येईल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी केले. ते ‘प्रयाग महाकुंभामध्ये हिंदूसंघटनाचे कार्य करण्याची सुवर्णसंधी’ या विषयावर बोलत होते.