वटपौर्णिमेपूर्वीच ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके हटवा !

भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. स्वाती शिंदे यांची आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी !

वटपौर्णिमेला शेकडो महिला करणार वडाच्या झाडाची पूजा !

सांगली, १९ जून (वार्ता.) – सांगली येथील वटवृक्षाच्या कट्ट्यावर अनधिकृत बसवलेले आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके त्वरित हटवावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी १९ जून या दिवशी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, अश्विनी तारळेकर, मनीषा शिंदे, विद्या दानोळे, छाया जाधव, लीना सावर्डेकर आदी महिला उपस्थित होत्या.

या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील स्टेशन रस्त्यावरील एस्.एफ्.सी. मॉलजवळ वटवृक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु महिला भगिनी वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाची पूजा करून नंतर हातात दोरा घेऊन फेर्‍या मारतात; परंतु या कट्ट्यावर  अतिक्रमण करून ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृतपणे खोके बसवले आहे. त्यामुळे महिलांना वटवृक्षाला प्रदक्षिणा घालता येत नाहीत. वारंवार तक्रार करूनही महापालिका याविषयी कोणतीच कारवाई करत नाही. (अनधिकृत खोके महापालिकेला स्वतःहून तर हटवावे वाटत नाही, तसेच तक्रार करूनही हटवत नाही, हे संतापजनक ! – संपादक) वटपौर्णिमेपूर्वी खोकेधारकांनी वाढवलेले खोके काढून कट्टा मोकळा करून द्यावा. वटपौर्णिमेच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महापालिका उत्तरदायी असेल, अशी चेतावणी अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी दिली आहे.