हिंदु एकता आंदोलन संघटनेच्या आंदोलनापूर्वीच सांगली पालिकेने केला ‘मॉडर्न चिकन ६५’चा हातगाडा जप्त !

वटपौर्णिमेपूर्वी ‘मॉडर्न चिकन ६५’चे खोके न हटवल्यास महापालिकेत ठिय्या आंदोलन करू ! – नितीनराजे शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

निदर्शने करतांना माजी आमदार नितीन शिंदे (मध्यभागी), वारकरी अन् हिंदुत्वनिष्ठ

सांगली, १८ जून (वार्ता.) – ‘येथील स्टेशन रोड परिसरातील वटवृक्षाची विटंबना करणारे ‘मॉडर्न चिकन ६५’ हे खोके (स्टॉल) वडाच्या झाडाचा कठडा फोडून अनधिकृतपणे बसवले आहे. हे खोके येत्या वटपौर्णिमेपूर्वी तेथून हटवावे, अन्यथा महापालिकेत ठिय्या आंदोलन करू’, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी येथे दिली. हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ‘मॉडर्न चिकन ६५’ या अनधिकृत खोक्यासमोर निदर्शने करून जोरदार घोषणा दिल्या. तथापि या निदर्शनापूर्वी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने तातडीने खोक्यासमोर पदपथावर असणारा ‘मॉडर्न चिकन ६५’ चा १ गाडा कुलूप तोडून जप्त केला.

तक्रार करूनही महापालिकेची टाळाटाळ !

हे खोके हटवण्याविषयी अनेक वेळा तक्रार करूनही सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने खोके हटवण्यास आजपर्यंत हेतूपुरस्सर आणि अक्षम्य टाळाटाळ केली आहे. (अशा अकार्यक्षम अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक) खोकेधारकाने खोक्याचा परवाना क्रमांक नसतांना अनधिकृतपणे भले मोठे खोके बसवले आहे. या खोक्याच्या शेजारीच असलेल्या पेट्रोलपंपाच्या निषिद्ध क्षेत्रात कचरा जाळून या खोक्याचे चालक आणि त्याचे साथीदार असलेल्या धर्मांधांकडून गजबजलेल्या या रहिवासी परिसरात मोठा धोका उत्पन्न होऊन घातपात होईल, अशी धोकादायक कृती वारंवार केली जाते. या संदर्भात पेट्रोलपंपाचे चालक, कामगार यांसह आसपासच्या हिंदूंनी सदर ‘मॉडर्न चिकन ६५’ विक्रीला विरोध केला, तर हे धर्मांध खोकीधारक हिंदूंना धमकावून त्यांच्यावर शस्त्राद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. (अशा उद्दाम धर्मांधांविरुद्ध हिंदूंनी संघटित होऊन मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करणे आवश्यक, तसेच पोलिसांचा धाक संपल्यानेच धर्मांध उद्दाम झाले आहेत ! – संपादक)

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ…

या आंदोलन प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे सांगली शहर अध्यक्ष श्री. प्रकाश चव्हाण, मिरज शहर अध्यक्ष श्री. सोमनाथ गोठखिंडे, खनभाग विभाग अध्यक्ष श्री. अवधूत जाधव, सांगलवाडी विभागाध्यक्ष श्री. अनिरुद्ध कुंभार, सर्वश्री प्रदीप निकम, संभाजी पाटील, श्रीधर मिस्त्री, भूषण गुरव, रमेश उबाळे, अरुण वाघमोडे, विक्रम हुलवाने, सुभाष धमाळ यांसह अनेक कार्यकर्ते आणि या भागातील वारकरी संप्रदायातील लोक अन् काही हिंदु महिला उपस्थित होत्या.

या वादग्रस्त खोक्याच्या समोरच श्री विठ्ठल मंदिर असून तेथे कीर्तन आणि भजन करणारे वारकरी अन् भाविक यांनी ‘या खोक्यावर तात्काळ कारवाई करून देवतांची विटंबना थांबवावी, तसेच या मंदिर परिसराचे पावित्र्य राखावे’, अशी रितसर मागणी केली आहे. या अनधिकृत खोक्याच्या संदर्भात महापालिका आयुक्तांना यापूर्वीच रितसर निवेदन देण्यात आले असून त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. हिंदु एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी सांगितले की, हप्ता घेऊन खोके चालू करण्यास महापालिकेने अनुमती दिली आहे का ?

या वेळी सर्वश्री दिलीप छाटबार, किरण मेहता, जयंतीलाल शहा यांच्याकडे मारहाण झालेल्या तक्रारदारांनी स्वत:च्या व्यथा मांडल्या. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता.

संपादकीय भूमिका :

हिंदूंच्या श्रद्धास्थानाजवळ अनधिकृतपणे बसवलेले ‘चिकनचे खोके’ पालिकेला न दिसणे हाच निधर्मीपणा का ?