काश्मीरमधील जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलावर घेण्यात आली रेल्वे वाहतुकीची चाचणी

चिनाब नदीवरील जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल

नवी देहली – काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधून पूर्ण झाला आहे. लवकरच या मार्गावर रेल्वे वाहतूक चालू होणार आहे. रेल्वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव यांनी चिनाब रेल्वे पुलावरील तपासणी रेल्वे चालवण्यात आल्याचा व्हिडिओ ‘एक्स’वरून प्रसारित केला आहे. त्यावर त्यांनी लिहिले आहे की, संगलदान ते रियासी पर्यंत आज पहली चाचणी रेल्वे गाडी यशस्वीपणे चालवण्यात आली. यात जगातील सर्वांत उंच चिनाब पूल पार करण्यात आला. या मार्गावरील जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत. केवळ ‘टनेल क्रमांक – १’ची काही किरकोळ कामे शेष आहेत.

चिनाब रेल्वे पूल हा १ सहस्र ४८६ कोटी रुपये खर्च करून चिनाब नदीवर अनुमाने ३५९ मीटर उंचीवर बांधला आहे. या पुलाच्या बांधकामात एकूण ३० सहस्र मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा पूल ताशी २६० किमी वेगाने वाहणार्‍या वार्‍याचादेखील सामना करू शकतो. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे.