राज्यात आजपासून वीज दरवाढ

पणजी, १५ जून (वार्ता.) – राज्य सरकारने वीज खात्याचा तोटा भरून काढण्यासाठी ४१४ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद केलेली असतांनाही १६ जूनपासून राज्यात ३.५ टक्के वीज दरवाढ लागू होणार आहे. संयुक्त वीज नियामक मंडळाने तसा आदेश काढला आहे. ही दरवाढ सर्वसाधारण ग्राहकांसमवेतच व्यवसाय, उद्योग क्षेत्रांतील ग्राहक आदी सर्वांनाच लागू होणार आहे.

राज्य सरकारच्या वीज खात्याने वर्ष २०२२-२३ वर्षापासूनच्या तोट्याची माहिती देत वीज दरवाढीसाठी आयोगाकडे याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर पणजी येथे ८ जानेवारी, तर मडगाव येथे ९ जानेवारी या दिवशी जनसुनावण्या घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आयोगाने १३ जून या दिवशी वीज दरवाढीचा आदेश काढला आहे. या आदेशाची कार्यवाही १६ जूनपासून करावी, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे.

घरगुती वीजग्राहकांसाठी नवीन दरवाढीचा तपशील

नवीन दरवाढीनुसार शून्य ते १०० युनिटपर्यंत प्रति युनिट १.९ रुपये, १०१ ते २०० युनिटपर्यंत प्रति युनिट २.८ रुपये, २०१ ते ३०० युनिटपर्यंत प्रति युनिट ३.७ रुपये, ३०१ ते ४०० युनिटपर्यंत प्रति युनिट ४.९ रुपये आणि ४०० युनिटच्या वरती प्रति युनिट ५.८ रुपये दर आकारला जाणार आहे. व्यावसायिक वीजग्राहकांसाठी वीज दरवाढीचा दर निराळा आहे.