नोकरीचे खोटे आश्वासन देणार्‍या खासगी शिक्षण संस्थांवर कारवाई होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १५ जून (वार्ता.) – राज्यातील काही खासगी अभ्यासक्रम (कोर्स) घेणार्‍या संस्था विद्यार्थ्यांना नोकरीचे खोटे आश्वासन देत आहेत. अशा संस्थांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी चेतावणी शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ जून या दिवशी ऑनलाईन (व्हर्र्च्युअल) पद्धतीने राज्यातील ‘स्वयंपूर्ण मित्र’ यांना संबोधित केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी सरकारने ‘स्वयंपूर्ण गोवा’ अंतर्गत कृषी आणि शिक्षण खाते यांवर भर दिल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाला कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांच्यासह विविध गावांतील सरपंच, पंचसदस्य आदी ऑनलाईन पद्धतीने जोडले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘राज्यातील काही खासगी अभ्यासक्रम घेणार्‍या संस्था त्यांच्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी देतात. याला भुलून काही विद्यार्थी कर्ज काढून अशा संस्थांच्या अभ्यासवर्गात प्रवेश घेतात; मात्र अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही. ही फसवणूक रोखण्यासाठी खासगी शिकवणी घेणार्‍या सर्व संस्थांची पडताळणी करण्याचा आदेश शिक्षण खात्याला देण्यात आला आहे. अशा शिक्षण संस्था आणि त्यांचा अभ्यासक्रम शिक्षण खात्याशी संलग्न आहे का ? याची पडताळणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी खासगी अभ्यासक्रमाच्या वर्गात प्रवेश करण्यापूर्वी तो मान्यताप्राप्त आहे का ? हे तपासले पाहिजे. असे अभ्यासक्रम सरकारी ‘आयटीआय’मध्ये असल्यास त्याला प्रथम प्राधान्य द्यावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (‘आयटीआय’मध्ये) कमी खर्चात चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना पुढे काय करावे यासंबंधी (‘करिअर’ संबंधी) सल्ला न मिळाल्याने त्यांची हानी होत आहे. हे टाळण्यासाठी ‘स्वयंपूर्ण मित्र’ यांनी विद्यार्थ्यांना ‘करियर’संबंधी (व्यावसायिक भवितव्य घडवण्याविषयी) मार्गदर्शन करावे, तसेच विद्यार्थ्यांपर्यंत सरकारच्या योजना पोचवाव्यात.’’