भारतात पुन्हा मोदी सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे विधान
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताकडून विविध वक्तव्ये आणि सर्व अडचणी असूनही आम्ही दायित्वाने वागत आहोत. आम्ही जम्मू-काश्मीर वादासह भारतासमवेतची सर्व सूत्रे चर्चेद्वारे सोडवण्यास सिद्ध आहोत. आम्ही शांततेने एकत्र पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो. आम्हाला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. आम्हाला आशा आहे की, दोन्ही देशांमध्ये शांतता कायम रहावी, यासाठी भारतही प्रयत्न करेल. संवादातून समस्यांवर उपाय शोधले जातील, असे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी केले आहे. भारतात पुन्हा मोदी सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
१. यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर त्याच्याशी संबंध सुधारण्याची आशा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, भारत-पाकिस्तान संबंधांचा स्वतःचा एक विशेष इतिहास आहे. अशा स्थितीत निवडणुकीनंतर परिस्थिती पालटेल, अशी अपेक्षा आहे.
२. मार्चमध्ये पाकचे परराष्ट्रमंत्री इशाक दार म्हणाले होते की, पाकिस्तानचा व्यापारी समुदाय भारतासमवेत व्यापार पूर्ववत् करू इच्छितो. या प्रकरणाशी संबंधित लोकांचा सल्ला घेऊन सर्व प्रस्तावांचा आढावा घेऊन सरकार निर्णय घेईल.
३. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही दिवस आधी पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी ‘नरेंद्र मोदी हे या निवडणुकीत हरले पाहिजे. पाकिस्तानातील प्रत्येकाला हेच हवे आहे. भारत-पाकिस्तान संबंध तेव्हाच सुधारतील, जेव्हा दोन्ही देशांतील आतंकवादी अल्प होतील’, असे म्हटले होते. (भारतात नाही, तर पाकमध्येच आतंकवादी आहेत ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारताशी असलेले संबंध पाकनेच भारतात जिहादी आतंकवादी कारवाया करून बिघडवले आहेत. पाकला खरेच भारताशी चांगले संबंध हवे असतील, तर त्याने आतंकवादी कारवाया बंद करून सर्व आतंकवाद्यांना भारताच्या स्वाधीन केले पाहिजे ! इतकेच नाही, तर पाकमधील हिंदूंचे रक्षण केले पाहिजे ! |