प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती !
पुणे – समदृष्टी, क्षमताविकास आणि संशोधन मंडळ (सक्षम) या दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या नागपूर येथील राष्ट्रीय संस्थेचे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ८ आणि ९ जून या दिवशी संपन्न होणार आहे, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद राज, स्वागताध्यक्ष अधिवक्ता एस्.के. जैन आणि प्रांताध्यक्ष अधिवक्ता मुरलीधर कचरे यांनी दिली. या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन ८ जूनला सकाळी १० वाजता होणार आहे. यामध्ये अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. या अधिवेशनाला देशभरातून ५०० जिल्ह्यातील १ सहस्र ५०० प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.
प्रेरक दिव्यांग पाहुणे रहाणार उपस्थित !
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे मार्गदर्शन करणार आहेत, तसेच इंदूरचे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जलतरणपटू पद्मश्री सत्येंद्रसिंह लोहिया, महाबळेश्वरचे प्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया, अभिनेत्री कु. गौरी गाडगीळ, अहमदाबादचे प्रसिद्ध आयटी उद्योजक शिवम पोरवाल प्रेरणादायी दिव्यांग अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
दिव्यांगांच्या सक्षमीकरणावर होणार चर्चा !
सामाजिक, व्यावहारिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इत्यादी जीवनाच्या विविध क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींना एकसंधतेचा अनुभव येईल, असे वातावरण निर्माण करण्यासाठी सक्षम कटिबद्ध आहे, तसेच ते स्वावलंबन, स्वाभिमान आणि सन्मानाने जगू शकतात आणि राष्ट्राच्या पुनर्रचनेत सक्रिय भूमिका बजावू शकतात. हा दृष्टिकोन समोर ठेवून या अधिवेशनात चर्चा होणार आहे.