पुणे येथील अग्रवाल पिता-पुत्रांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

पैशांसाठी दिलेल्या मानसिक त्रासातून आत्महत्या !

विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल

पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यासह अन्य ५ जणांवर बांधकाम व्यावसायिक शशिकांत कातोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कातोरे यांनी ९ जानेवारी या दिवशी वडगाव शेरी येथील रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी दत्तात्रय कातोरे यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. या प्रकरणामध्ये विनय काळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे अन्वेषण करतांना सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवि हुडलानी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृत शशिकांत कातोरे यांचे ‘सद्गुरु इन्फ्रा’ नावाचे आस्थापन होते. त्यांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे होते. त्या वेळी काळे यांची भेट झाली. काळे यांनी कर्ज देतो; प्रतिमाह ५ टक्के परतावा देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे त्यांनी व्यवहार पूर्ण केला. पुन्हा कातोरे यांनी पैसे घेतले; परंतु त्या वेळी चक्रवाढ व्याज लावण्यास प्रारंभ केला. घरी जाऊन ‘आम्हाला पैसे दिले नाही, तर तुम्हाला कारागृहात पाठवतो’, अशी धमकी दिली. त्यांच्या या छळाला कंटाळून कातोरे यांनी आत्महत्या केली होती.


मकानदार आणि डॉ. तावरे यांचा ७० वेळा संवाद !

कल्याणनगर अपघात प्रकरणामध्ये रक्ताचा नमुना पालटल्याच्या प्रकरणी अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. मकानदार यांची भूमिका संशयास्पद होती. ते अवैध व्यवसायाशी निगडित असून पोलिसांसाठी हप्ते (पैसा) गोळा करत असल्याचे पुढे येत आहे. (संबंधित पोलिसांशी चौकशी करून त्यांची नावे पुढे आणणे, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक) अपघातामध्ये मकानदार यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. विशाल अग्रवाल यांनी मकानदार यांच्या साहाय्याने डॉ. अजय तावरे यांना पैसे दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गेल्या ५ महिन्यांमध्ये डॉ. अजय तावरे आणि मकानदार यांच्यात ७० वेळा भ्रमणभाषच्या माध्यमातून संवाद झाल्याचे अन्वेषणातून समोर आले आहे.