India Taiwan Relation : (म्हणे) ‘भारताने तैवानच्या राजकीय चालीला विरोध केला पाहिजे !’ – चीन

तैवानच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदी यांच्या विजयावरून अभिनंदन केल्याने चीनचा थयथयाट !

(डावीकडून) तैवानचे राष्ट्रपती लाइ चिंग-ते, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तैवानचे राष्ट्रपती यांच्यातील सामाजिक माध्यमांवरील पोस्टद्वारे झालेल्या संभाषणाचा चीनने निषेध केला आहे. तैवानच्या राष्ट्रपतींनी भाजपप्रणीत आघाडीच्या विजयासाठी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले होते. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आभार व्यक्त केले होते. ‘भारताने तैवानच्या अधिकार्‍यांच्या ‘राजकीय चाली’ला विरोध केला पाहिजे’, असे म्हणत चीनने याचा निषेध केला.

अमेरिकेने घेतली भारताची बाजू !

या प्रकरणी अमेरिकेने मत मांडले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना याविषयी प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, मी पूर्ण माहिती जाणून घेतलेली नाही; मात्र अशा प्रकारे अभिनंदन करणे, हा राजनयिक कामाचा एक भाग आहे.

(म्हणे) ‘तैवान चीनचा भाग !’

चीनच्या म्हणण्यानुसार, तैवान हा त्याचा अविभाज्य प्रांत असून काहीही करून तो मुख्य भूमीशी (चीनशी) पुन्हा जोडला गेला पाहिजे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटले की, चीन तैवानचे अधिकारी आणि चीनशी राजनैतिक संबंध असलेल्या देशांमधील सर्व प्रकारच्या अधिकृत संवादाला विरोध करतो. जगात एकच चीन आहे आणि तैवान हा चीन प्रजासत्ताकाचा अविभाज्य भाग आहे. ‘एक-चीन तत्त्व’ हे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सर्वमान्य प्रमाण आहे आणि याविषयी आंतरराष्ट्रीय समुदायात एकमत आहे. भारताने या सूत्रावर गंभीर राजकीय वचनबद्धता व्यक्त केली आहे. भारताने तैवानच्या अधिकार्‍यांच्या राजकीय हालचाली ओळखणे आणि त्यास विरोध करणे अपेक्षित आहे. याविषयी चीनने भारताकडे निषेध नोंदवला आहे.

भारत आणि तैवान यांच्यात काय झाले होते संभाषण ?

‘निवडणुकीतील विजयाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. आम्ही वेगाने वाढणारी ‘तैवान-भारत भागीदारी’ पुढे नेण्यासाठी, आशिया-प्रशांत (इंडो-पॅसिफीक) प्रदेशात शांतता आणि समृद्धी यांसाठी योगदान देण्यासाठी, व्यापार, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात आमचे सहकार्य वाढवण्यास उत्सुक आहोत’, अशी पोस्ट तैवानचे राष्ट्रपती लाइ चिंग-ते यांनी केली होती. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी ‘लाइ चिंग-ते, तुमच्या प्रेमळ अभिनंदनासाठी धन्यवाद. मी तैवानशी आणखी घनिष्ट संबंधांची अपेक्षा करतो. परस्पर फायदेशीर आर्थिक आणि तांत्रिक भागीदारीच्या दिशेने काम करतो’, असे म्हणत आभार मानले होते.

संपादकीय भूमिका

भारताने काय करावे आणि काय करू नये ?, हे चीनने सांगण्याची आवश्यकता नाही. ‘भारताने चीनला त्याच्या परराष्ट्र धोरणांवर चीनला सल्ले दिल्यावर चीन ऐकणार आहे का ?’ असा प्रश्‍न भारताने चीनला विचारायला हवा !