AP Muslim Reservation : आंध्रप्रदेशात मुसलमानांचे आरक्षण कायम रहाणार ! – तेलुगू देसम्

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष !

तेलुगू देसम् पक्षाचे नेते रवींद्र कुमार

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशातील मुसलमानांसाठीचे आरक्षण आहे तसेच राहिल. त्यात काहीच अडचण नाही, असे विधान भाजपप्रणीत आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष असणार्‍या तेलुगू देसम् पक्षाचे नेते रवींद्र कुमार यांनी केले. मुसलमानांना आरक्षण देण्याच्या विरोधात भाजपचे धोरण असतांना आता सहकारी पक्ष मुसलमानांना आरक्षण देण्याच्या सूत्रावर भाजप काय भूमिका घेणार ?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसने कर्नाटकमध्ये मुसलमानांना आरक्षण दिल्याचे सूत्र भाजपकडून उपस्थित करण्यात आले होते. ‘धर्माच्या आधारावर मुसलमानांना आरक्षण देता येणार नाही आणि आम्ही ते कधीही देणार नाही’, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली होती. आंध्रप्रदेशातील निवडणुकीत मावळते मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तेलुगू देसम्वर टीका करत ‘ते राज्यातील मुसलमानांचे आरक्षण रहित करतील’, असा आरोप केला होता. त्यामुळे तेलुगू देसम्चे अध्यक्ष एन्. चंद्राबाबू नायडू यांनीही मुसलमान आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे घोषित केले होते.