सांगली येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे ! – शुभम गुप्ता, आयुक्त

बैठकीत बोलतांना आयुक्त शुभम गुप्ता आणि उपस्थित अधिकारी

सांगली, ६ जून (वार्ता.) – सांगली आणि मिरज येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्यात आला असून तो २४ घंटे कार्यरत रहाणार आहे, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी ६ जून या दिवशी येथे झालेल्या महापालिकेच्या बैठकीत दिली.

ते म्हणाले की, सर्व विभागांतील संबंधित अधिकार्‍यांनी मान्सून परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजनांसाठी दक्ष रहावे. विनापरवाना अधिकारी आणि कर्मचारी रजेवर गेल्यास त्यांच्यावर विनानोटीस कारवाई होईल. महापालिका क्षेत्रातील ९५ टक्के नालेस्वच्छता पूर्ण झाली आहे. उर्वरित २ दिवसांत पूर्ण होईल. नाले स्वच्छतेनंतर गाळ उचलला आहे. प्रभाग समिती क्रमांक १ मधील अतीधोकादायक इमारत पाडली आहे. न्यायालयीन प्रकरणी शासन निर्णयानुसार कार्यपद्धती अवलंबून उर्वरित धोकादायक इमारती पाडण्यात येणार आहेत. महापालिका क्षेत्रातील विनापरवाना २७ फलक काढले आहेत. पूरग्रस्त भागात बाधित होणार्‍या रहिवाशांसाठी तात्पुरता निवारा आणि अन्य सोयीसुविधा देण्याविषयी सूचना केल्या आहेत, तसेच पशूधनाविषयीही काळजी घेण्यात येणार आहे.