भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून पदावर बसणार आहेत. ३ वेळा मुख्यमंत्री पदावर बसणारे आणि नंतर ३ वेळा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी भारतातील एकमेव राजकारणी आहेत. विशेष म्हणजे मोदी आमदारकीची निवडणूक न लढवता थेट मुख्यमंत्रीपदी बसले आणि खासदार झाल्यावर थेट पंतप्रधान पदावर त्यांना बसवण्यात आले. देशात असे अन्य कुणीही झालेले नाही. राजीव गांधी थेट पंतप्रधान झाले होते; मात्र ते पुढच्या वेळी पुन्हा पंतप्रधान होऊ शकले नव्हते. मोदी यांच्या या यशाचा अभ्यास करणे आवश्यक आहे; कारण केवळ विकास आणि करिश्मा (चमत्कार) असला, म्हणजे जनता मत देते, असे होत नाही, तर जनतेचा विश्वास प्राप्त करणे सर्वांत महत्त्वाचे असते अन् तो विश्वास पंतप्रधान मोदी यांनी प्रथम पक्षाचा, नंतर मुख्यमंत्री म्हणून गुजरात राज्याचा आणि आता पंतप्रधान म्हणून देशातील जनतेचा संपादन केला आहे. इतकेच नव्हे, तर विदेशात रहाणारे भारतीय आणि अनेक विदेशी नागरिक, राष्ट्रप्रमुखही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करू लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

१. मोदी यांचे ५३ वर्षांचे सार्वजनिक जीवन

पंतप्रधान मोदी यांचा जन्म १९५० मध्ये झाला आणि ते वर्ष १९७० मध्ये रा.स्व. संघाचे पूर्णकालीन स्वयंसेवक झाले. आता ते ७३ वर्षांचे आहेत, म्हणजे ५३ वर्षांचे सार्वजनिक जीवन त्यांनी आतापर्यंत व्यतित केले आहे. यातील जवळपास २३ वर्षे त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून अधिकारपदावर काढली आहेत. संघाचे प्रचारक असतांना त्यांनी देशातील विविध राज्यांमध्ये काम केले आहे. त्यांना भारताचा भूगोल आणि इतिहासही ठाऊक आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात ते जाऊन आले आहेत. यामुळे त्यांचा समाजाशी असलेला संपर्क दांडगा आहे. त्यांना समाजाची मानसिकता, भाषा, विचार यांची नस पकडता येते. देशासाठी संपूर्ण जीवन निरपेक्ष भावाने त्यांनी अर्पण केल्यामुळे त्यांच्यात देशभक्ती ओतप्रोत भरली आहे. हीच देशभक्ती त्यांना सदा सर्वकाळ देशाचा, देशाच्या विकासाचा, प्रगतीचा विचार करण्यास उद्युक्त् करते. देशातील अन्य राजकारण्यांप्रमाणे ते संसारात अडकले नाहीत. त्यांच्यावर संघाचा संस्कार असला, तरी त्यांच्यामध्ये आध्यात्मिक साधनेचेही बळ आहे. त्याच्या जोरावरच ते गेले ५३ वर्षे अविरत कार्यरत आहेत आणि त्यांना ईश्वराची कृपाही लाभत आहे. या बळावरच ते आतापर्यंत वेगवेगळी संकटे येऊनही कार्य करू शकले. अशा प्रकारचे कार्य आणि त्यात यशस्वी होणारा भारताच्या राजकारणात अन्य कुणी नेता नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षातून किंवा विरोधी पक्षांतूनही आव्हान देणारा कुणी नाही.

श्री. प्रशांत कोयंडे

२. हिंदु धर्माला पुनर्प्रतिष्ठा मिळवून देणारे संन्यस्तवृत्तीचे पहिले प्रखर हिंदुत्वनिष्ठ पंतप्रधान !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांच्यावर रा.स्व. संघाचा संस्कार असल्याने ते हिंदुत्वनिष्ठ आहेत. त्यांच्या स्वतःचा हिंदुत्वाच्या संदर्भात दांडगा अभ्यास आहे. त्याच वेळी ते आध्यात्मिकही आहेत. पूर्णकालीन स्वयंसेवक असतांना ते काही वर्षे संन्यासी म्हणून साधना करू लागले होते. त्यांना संतांनी सांगितल्यावर ते पुन्हा संघात येऊन प्रचार करू लागले. संतांना मोदी यांच्या हातून मोठी देश आणि धर्म सेवा घडणार असल्यानेच त्यांना पुन्हा समाजामध्ये जाण्यास सांगितले, हे लक्षात येते. ते भारताचे पहिले असे पंतप्रधान आहेत त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा बाऊ न करता थेट स्वतःच्या धर्मस्वातंत्र्याचा अधिकार बजावत हिंदूंच्या मंदिरांचा विकास केला. अनेक मंदिरांमध्ये जाऊन नियमित पूजा केली. धार्मिक विधी केले. काशीविश्वनाथ मंदिराचा विकास हे त्यांचे सर्वांत मोठे यश मानले जाते. इतकेच नाही, तर अवघड अशा केदारनाथ मंदिर परिसराचाही ते विकास करत आहेत. श्रीराममंदिराच्या निर्मितीमध्येही त्यांचा सल्ला घेतला गेला. अयोध्येच्या विकासात त्यांचा मोठा हात आहे. श्रीराममंदिरातील श्रीरामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूपाच्या) प्राणप्रतिष्ठेसाठी ते यजमान होते. त्यामुळे त्यांना ३ दिवसांचे अनुष्ठान करण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी ११ दिवस अनुष्ठान केले. यात उपवास करायचा असतो, भूमीवर झोपायचे असते. या काळात त्यांनी या सर्वांचे पालन करून दक्षिण भारतात जाऊन काही प्राचीन मंदिरांमध्ये दर्शन घेतले होते. भारताच्या इतिहासात असा पंतप्रधान झाला नाही.

पंतप्रधान मोदी प्रत्येक आश्विन नवरात्रीमध्ये ९ दिवस उपवास करतात. काही वर्षांपूर्वी नवरात्रीच्या काळात ते अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले असतांना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या रात्रीच्या भोजनाच्या वेळी केवळ पाणी प्यायले होते.

३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यासाठी प्रयत्न करणारे मोदी !

पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत एखाद्या प्रसंगामध्ये अस्थिर झाल्यास ते काय करतात ? याविषयीची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, तो संपूर्ण प्रसंग कागदावर लिहून काढतात. त्यात त्यांचे चिंतन लिहितात आणि मग तो कागद फाडून फेकून देतात. यानंतर पुन्हा ते त्या प्रसंगाचा विचार करत नाहीत. यातून ते कोणत्याही प्रसंगामध्ये अनावश्यक अडकत नाहीत आणि पुढचा विचार करतात.

४. मोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यावर विविध क्षेत्रांत केलेले कार्य !

४ अ. उद्योग

४ अ १. मेक इन इंडिया : पूर्वी भारत अन्य देशांकडून उपकरणे विकत घेत असे, तेव्हा त्याचे ‘स्पेअर पार्ट’ही (सुटे भाग) नंतर आयात करत असत. विशेषतः शस्त्रास्त्रे विकत घेतांना असे होत असे; मात्र पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेद्वारे विदेशांतून जे काही विकत घेणार, त्यातील काही भाग भारतात बनवण्यासह नंतर त्याचे सुटे भाग देशात बनवण्याची अट घालण्यास प्रारंभ केला. महत्त्वाचे म्हणजे त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या अटींमुळे भारतात या विदेशी आस्थापनांचे कारखाने चालू झाले. त्यामुळे भारतियांना रोजगार मिळाला.

४ अ २. स्टार्टअप : भारतात पूर्वी कारखाने, उद्योग, व्यवसाय करण्याचा कुणी प्रयत्न करत नव्हता. तरुणांना उद्योग प्रारंभ करण्यासाठी स्टार्टअप योजना चालू करून तरुणांना सर्व प्रकारचे साहाय्य देण्यास प्रारंभ केला. त्यामुळे लक्षावधी नवीन व्यवसाय चालू झाले.

४ अ ३. ‘लोकल फॉर व्होकल’, म्हणजे स्थानिक लोकांच्या कलांना, उत्पादनांना प्रोत्साहन : भारत स्थानिक स्तरांवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने बनवली जातात. त्यांना स्थानिक स्तरावरच बाजार उपलब्ध होतात. अशी उत्पादने देश आणि विदेशातही विक्री व्हावीत आणि त्यांचा अधिकाधिक प्रसार होण्यास स्थानिकांना आर्थिक लाभ व्हावा, याच उद्देशाने ही योजना आणली आहे. याचा मोठा लाभ भारतियांना होत आहे.

४ अ ४. विमानतळांची संख्या दुपटीहून अधिक करणे : देशात गेल्या १० वर्षांत दुपटीहून अधिक विमानतळांची निर्मिती झाली आहे. लोकांना अधिकाधिक प्रवास जलद आणि सुलभ व्हावा यासाठी पंतप्रधानांनी हा प्रयत्न केला. ज्या प्रमाणे विमानतळे वाढणार त्याच प्रमाणात विमानांची संख्याही वाढवावी लागणार. यातून त्यांनी विमाने विकत घेण्याचा मोठा करार विदेशी आस्थापनांशी केले. यामुळे विदेशांनाही रोजगार मिळाला आहे.

४ अ ५. रेल्वेचे आधुनिकीकरण : गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेचे अधिकाधिक आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बुलेट ट्रेन’ हे त्यांचे स्वप्न आहे. त्यापूर्वी त्यांनी भारतीय वातावरणासाठी ‘वन्दे भारत’ नावाच्या गाड्यांची निर्मिती केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाड्यांमुळे रेल्वेची गती वाढली आहे.

४ आ. संरक्षण

४ आ १. पाकशी संबंध तोडणे : पंतप्रधान मोदी यांनी वर्ष २०१४ नंतर पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. ते लाहोरमध्ये त्यांच्या वाढदिवसालाही अचानक जाऊन आले; मात्र नंतर ते संबंध वेगवेगळ्या कारणांनी चांगले होऊ शकले नाहीत, तसेच भारतातील आतंकवादही चालू राहिल्याने मोदी यांनी पाकशी संबंध तोडले. पाकनेही भारतासमवेत व्यापार करण्याचे बंद केले. त्यामुळे पाकलाच त्याची हानी झाली.

४ आ २. सर्जिकल आणि एअर स्ट्राईक : काश्मीरमधील पुलवामा आणि उरी येथील सैन्यावरील आक्रमणानंतर पाकमध्ये भारतीय सैन्याने अन् वायूदलाने घुसून आतंकवाद्यांना ठार केले. यामुळे पाकवर वचक बसला.

४ आ ३. शस्त्रनिर्मिती आणि विक्री : काँग्रेसच्या राज्यात गांधीवादी, अहिंसावादी भूमिकेमुळे भारताने शस्त्रनिर्मितीकडे आणि त्याच्या विक्रीकडे कधी पाहिलेच नाही. मोदी आल्यानंतर त्यांनी शस्त्रनिर्मिती आणि शस्त्रविक्री करण्याला चालना दिली. ‘तेजस’ ही भारताच्या पूर्णपणे स्वदेशी लढाऊ विमानाची निर्मिती आहे आणि भारत तेजसला अन्य देशांना विकणार आहे. त्याच वेळी ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र रशियाच्या साहाय्य बनवले, तरी विदेशात त्याला मागणी आहे आणि ते विकण्यात येणार आहे.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

तिसर्‍या कार्यकाळात पंतप्रधान मोदी यांच्याकडून हिंदूंना असलेली अपेक्षा !

पंतप्रधान मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होणार आहेत. गेल्या २ कार्यकाळात, म्हणजे १० वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी केलेला विकास आणि हिंदुत्व यांचे कार्य यांमुळेच बहुसंख्य हिंदूंनी त्यांना तिसर्‍यांदा या पदावर बसवले आहे. आता पुढील ५ वर्षांत त्यांना अनेक मोठी कार्ये करावी लागतील. ही कार्ये केली, तर ते भारताच्या इतिहासात आणि हिंदूंच्या हृदयात कायमचे अढळपद मिळवतील, असे वाटते. ती कार्ये पुढीलप्रमाणे आहेत –

  • राज्यघटनेतील प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द काढून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे
  • देशात धर्मांतरविरोधी कायदा करणे
  • संपूर्ण देशात गोहत्या बंदी करणे
  • समान नागरी कायदा करणे
  • हिंदूंना धर्मशिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणे
  • देवभाषा संस्कृतला पुनरूज्जीवित करणे

विश्वनेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

‘अनेक परदेशी दौर्‍यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेते आणि बहुपक्षीय संस्था यांच्याशी ‘भारतीय पुरातन वस्तू’ या विषयावर चर्चा केली. त्याचा परिणाम म्हणून विदेशातील २५१ पुरातन वस्तू भारतात परत आणल्या आहेत. यानंतर वर्ष २०२२ मध्ये अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी ३०७ पुरातन वस्तू भारताला परत केल्या. या वस्तू अनेक लहान तस्करी मार्गांनी आपल्या देशातून चोरीला गेल्या होत्या. त्यांचे मूल्य सुमारे ४ दशलक्ष डॉलर आहे. याच वर्षात १३ देशांनी एकूण ६८२ पुरातन वस्तू परत केल्या आहेत, ज्यांचे मूल्य ८४ दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक (७० कोटी रुपयांहून अधिक) आहे.

‘पुरातन वस्तू तस्करी युनिट’ने त्याच्या स्थापनेपासून सुमारे २२०० पुरातन वस्तू परत आणल्या आहेत. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत विदेशातून अनेक पुरातन वस्तू परत आणण्यात यश मिळवले आहे. या व्यतिरिक्त वर्ष २०१४ पासून ४१ कलाकृती भारतात आणल्या गेल्या आहेत की, ज्या मुख्यत्वे ११ व्या ते १४ व्या शतकांच्या कालावधीतील आहेत, तसेच इ.स.पूर्व २००० मधील तांब्याच्या मानववंशीय वस्तू किंवा दुसर्‍या शतकातील टेराकोटा फुलदाणी यांसारख्या ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा समावेश यामध्ये आहे. अर्ध्या कलाकृती सांस्कृतिक आहेत, उर्वरित अर्ध्यामध्ये हिंदु धर्म, बौद्ध आणि जैन यांच्याशी संबंधित असलेल्या मूर्ती आहेत. त्यांची निर्मिती धातू, दगड आणि टेराकोटापासून केली आहे.’

– सुधा साठ्ये

(साभार : त्रैमासिक ‘समर्थ’, ऑक्टोबर २०२३)

पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/801916.html