JDU In Modi 3.0 Govt : अग्नीवीर योजनेचा पुनर्विचार, तर समान नागरी कायद्यावर चर्चा करा ! – जनता दल (संयुक्त) पक्ष

नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाची मागणी

डावीकडून केसी त्यागी आणि नितीश कुमार

नवी देहली – भाजपप्रणीत आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष ठरलेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाकडून समान नागरी कायदा, अग्नीवीर योजना, एक देश एक निवडणूक या मोदी यांच्या योजनांच्या संदर्भात मत व्यक्त करण्यात आले आहे. जनता दल (संयुक्त) पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी सांगितले की, या सूत्रांवर सर्व राज्यांशी बोलण्याची आणि त्यांचे विचार समजून घेण्याची आवश्यकता आहे, हे आम्ही आधीही सांगितले होते.

त्यागी पुढे म्हणाले की, आमचा ‘एक देश एक निवडणूक’ या सूत्राला पाठिंबा आहे. अग्नीवीर योजनेला फार विरोध झाला होता. निवडणुकीतही त्याचा परिणाम दिसला आहे. यावर पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे. समान नागरी कायद्यावर नितीश कुमार यांनी विधी आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहून ‘आम्ही याच्या विरोधात नाही; मात्र यावर व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे’, असे म्हटले होते. तीच भूमिका आजही आहे, असे त्यांगी यांनी यांनी स्पष्ट केले.

बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या !

त्यागी पुढे म्हणाले की, आम्ही बर्‍याच काळापासून मागणी करत आहोत की, बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या. जर बिहारमधून लोकांचे स्थलांतर रोखायचे असेल, तर हे करणे आवश्यक आहे.