‘हिंदु समाजासारखा मूर्ख समाज नाही’, हे हिंदूंनी पुन्हा एकदा सिद्ध केले. एक फतवा निघतो आणि त्यांची मतदानाची टक्केवारी वाढते; पण आम्ही मात्र मतदानासाठी बाहेरच पडत नाही. ‘काँग्रेस किंवा ‘इंडी’ आघाडी, म्हणजे मुसलमानांची सत्ता’, हे आपल्याला कळत नसेल, विशेष करून बहुसंख्य बुद्धीवादी, उच्चशिक्षित तरुणांना कळत नसेल, तर यासारखे दुर्दैव नाही. ‘मोदी विरोध म्हणजे काँग्रेसचा लाभ म्हणजेच मुसलमान तुष्टीकरण’, हे आपल्याला कळत नसेल, तर तो आपला मूर्खपणा आहे.
१. चुका असल्या, तरी हिंदूंना हिंदूहितच कळत नाही !
‘महाराष्ट्रात अजित पवारांना बरोबर घेणे’, यांसारख्या अनेक चुका त्यांना भोवणार’, असे बोलले जात होते; पण त्यासाठी भाजपला मतदान न करणे, म्हणजे काँग्रेसला साहाय्य हे आपल्याला (हिंदूंना) कळत नसेल, तर दोष आपला आहे. सर्वसामान्य महिला वर्ग भुलला तो ‘खटाखट १ लाख रुपयांना’; पण ‘इतके पैसे देता येणे कुठल्याही सत्तेला शक्य नाही’, हे भाजप त्यांना पटवून देऊ शकला नाही. मूर्ख समजल्या जाणार्या पप्पूला (काँग्रेसचे राहुल गांधी यांना) यासाठी १०० गुण द्यायला हवेत. मुख्य म्हणजे ‘हिंदूंना हिंदूहितच कळत नाही’, ही सत्य परिस्थिती आहे.
२. हिंदूंच्या र्हासाला जातीजातीतील विद्वेष कारणीभूत !
एक फतवा निघाला आणि मोदीविरोधी मतदान झाले; पण हिंदूहित हे आपले ‘ब्रह्मवाक्य’ ठरू शकत नाही, याला कारण आपल्यातील जातीयवाद ! आणि तोच आपल्याला या निवडणुकीतही घातक ठरला आहे. मुंबईत ‘मराठी विरुद्ध गुजराती’, या जातीयवादाने हरले हिंदूच; कारण निवडून आलेल्या हिंदूंनाही आणि त्यांना मते देणार्या हिंदू मतदारांनाही हिंदूहिताशी काहीही देणे-घेणे नाही. कुठे ‘कुणबी विरुद्ध आग्री’, या जातीयवादाने हरला हिंदूच. ‘ब्राह्मण ब्राह्मणेतर’, हा वाद तर होताच; पण विकोपाला जात असलेला जातीजातीतील विद्वेष कारणीभूत होत आहे आपल्याच, म्हणजेच हिंदूच्याच र्हासाला !
३. …अन्यथा हिंदूंचे अस्तित्वच उरणार नाही !
कलम ३७० (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा) रहित करणे, समान नागरी कायदा आणण्याचा विचार करणे, श्रीराममंदिराचे आनंद सोहळे, विदेशात भारताला मिळत असलेला मान, देशाची प्रगती याला काडीचेही महत्व नाही. उद्या देश विकायला काढला, तरी ‘मला काय त्याचे’, ‘आम्ही करणार जातीपातीचे राजकारण, भरणार स्वतःच्या तुंबड्या आणि देणार हिंदूहिताचा बळी.’ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘राजकारणाचे हिंदूकरण’ झाले नाही, तर हिंदूंना अस्तित्वच उरणार नाही. आताच्या फटक्यातून हिंदू जागा झाला तर ठीक, नाही तर तो ‘खटाखट खटाखट’ संपणार आहे हे निश्चित !
हिंदूच उरला नाही की, जातीपातीचे राजकारण करणारे स्वतःही उरणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. हिंदु नामशेष व्हायला नको असेल, तर हिंदूंनो हिंदूंच्याच अस्तित्वासाठी आतातरी जागे व्हा…!
– मंजिरी मराठे, मुंबई. (४.६.२०२४)
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, मराठी आणि फेसबुक)