‘२६.४.२०२४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मला सामवेदी श्री. कार्तिक जोशीगुरुजी यांच्या सामगायन कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री गणेशाचे मंत्रपठण ऐकतांना स्वतःला गणपतीची सोंड असल्याचे साधिकेला जाणवणे
श्री. कार्तिक जोशीगुरुजी यांनी प्रथम स्वतः ‘ॐ गं गणपतये नम: ।’ हा नामजप केला आणि तो उपस्थितांकडूनही करवून घेतला. त्यानंतर त्यांनी श्री गणेशाचे मंत्रपठण केले. ते मंत्रपठण करत असतांना माझे कपाळ, भुवया, डोळे आणि नाक यांमध्ये जडत्व जाणवत होते. त्या वेळी मला गणपतीची सोंड असल्याचे जाणवत होते. ही स्थिती मला २ – ३ वेळा जाणवली.
२. श्रीविष्णूचा कूर्म अवतार असल्याने गुरुजी न्यास करत मंत्र म्हणत असतांना त्यांच्या हातांच्या हालचालींमध्ये कासव दिसणे
गुरुजी न्यास करत मंत्र म्हणत होते. तेव्हा मला त्यांच्या हातांच्या हालचालींमध्ये कासव दिसू लागले. तेव्हा ‘मला कासव का दिसत आहे ?’, असा माझ्या मनात विचार आला. गुरुजींनी सामवेदाचे महत्त्व सांगतांना ‘सामवेदामध्ये श्रीविष्णु आहे’, असे सांगितले होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की, श्रीविष्णूचा हा ‘कूर्म अवतार’ आहे; म्हणून मला कासवाच्या माध्यमातून श्रीविष्णूने दर्शन दिले असावे. त्यानंतर माझी भावजागृती झाली.
३. मंत्रपठण आणि गायन ऐकतांना शांत वाटणे
गुरुजी मंत्रपठण आणि गायन करत असतांना माझे डोळे आपोआपच मिटत होते. डोळे मिटल्यावर मला शांत वाटत होते. मला ‘डोळे उघडूच नयेत’, असे वाटत होते.
४. कृतज्ञता
गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळे आम्हाला आज सामवेद ऐकण्याचे भाग्य लाभले. मी प्रथमच ते ऐकत होते. नेहमी आम्ही ऋग्वेदातील परुषसूक्त आणि श्रीसूक्त ऐकत होतो. आता गुरुजींकडून सामवेदातील पुरुष सूक्त आणि श्रीसूक्त ऐकून आनंद झाला. ‘मंत्र म्हणतांना न्यास केल्याने लाभ होतात’, हेही मला शिकायला मिळाले. माझ्या मनात विचार आला, ‘जसे कासवी आपल्या पिल्लांकडे दुरूनच लक्ष देते आणि त्यांचा सांभाळ करते, तसे गुरुदेवा, आपण आपल्या दूरवर असलेल्या पिल्लांना (आम्हा साधकांना) आवश्यक ते देऊन त्यांच्याकडून साधना करवून घेता आणि आनंदही देता. त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी अल्पच आहे.’
– सौ. सुजाता रेणके (वय ६१ वर्षे), फोंडा, गोवा. (२७.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |