हिंदुहितासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चिंतन आजही मूलगामी ! – सौ. मंजिरी मराठे

सौ. मंजिरी मराठे

परभणी, ३० मे (वार्ता.) – स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षांत हिंदूंच्या स्थितीत विशेष फरक पडला नाही, हे या समाजाचे दुर्दैव आहे. सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या अभ्यासणे, त्यातील व्यापकता ओळखणे आवश्यक आहे. समाजात सामाजिक समरसतेसह सामाजिक सन्मान सर्वांना प्राप्त करून देणे ही काळाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच हिंदुहिताच्या दृष्टीने सावरकरांचे चिंतन आजही मूलगामी ठरणारे आहे, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्था मुंबईच्या विश्वस्त आणि मुंबई दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका अन् सावरकर साहित्याच्या अभ्यासिका सौ. मंजिरी मराठे यांनी व्यक्त केले. येथील वैष्णवी मंगल कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर

सौ. मंजिरी मराठे म्हणाल्या…

१. हिंदुस्थानातील जनता एकत्र आली, तर आपल्याला देशावर राज्य करणे शक्य होणार नाही, हे इंग्रज जाणून होते. त्यामुळेच त्यांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती पद्धतशीरपणे अवलंबली. सावरकरांनी हेच ओळखून हिंदु हितासाठी हिंदु महासभेचे संघटन उभे केले. हिंदुहिताच्या दृष्टीने सातत्याने चिंतन केले, त्यादृष्टीने जागरणसुद्धा केले; परंतु स्वातंत्र्यानंतरसुद्धा हिंदूंच्या स्थितीत आजही विशेष फरक पडला नाही.

२. हिंदु समाजात आजही मोठ्या प्रमाणावर जाती-पाती फोफावल्या आहेत. जातीपातीचेच राजकारण खेळले जात आहे. जातीयता राष्ट्रघातक आहे, हे ओळखूनही समाजात सामाजिक समरसतेच्या दृष्टीने गांभीर्याने प्रयत्न होत नाहीत, हे समाजाचे दुर्दैव आहे.

३. हिंदु समाज संघटन ही काळाची आवश्यकता असून कौटुंबिकता, सामाजिकता, राष्ट्रीयता, आर्थिक व्यवहार या गोष्टींत हिंदुत्वाचा विचार प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्याविना पर्याय नाही.