१. अग्निहोत्र करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री चामुंडादेवीचा जप करत तुपाची आहुती अर्पण केल्यावर त्यांना अग्निकुंडामधून प्रकाश बाहेर आल्याचे जाणवणे
‘२१.९.२०२३ या दिवशी सकाळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या अग्निहोत्र करण्यासाठी बसल्या होत्या. सकाळी अग्निहोत्राला बसल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी प्रार्थना केली, ‘या आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण होवो आणि सनातन संस्थेचे कार्य गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे वाढो.’ त्यानंतर त्यांनी चामुंडादेवीचा जप करून अग्निपात्रामध्ये तुपाची आहुती अर्पण केली. आहुती संपत आल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ‘अग्निकुंडामधून प्रकाश बाहेर आला’, असे जाणवले.
२. अग्निकुंडामध्ये शेणाच्या गोवर्यांवर देवीचा आकार आणि काळभैरव यांच्या मुखाचा आकार सिद्ध झालेला दिसणे
त्यानंतर त्यांनी अग्निकुंडामध्ये पाहिल्यावर त्यांना शेणाच्या गोवर्यांवर देवीचा आकार सिद्ध झालेला दिसला. त्यात देवी साक्षात् मांडी घालून बसली आहे आणि देवीने तिचा एक चरण खाली सोडला आहे. देवीच्या हातामध्ये वीणा दिसत आहे. देवीच्या मागे शेषनाग आहे. कांचिपुरम्ची श्री कामाक्षीदेवी जशी बसली आहे, त्याप्रमाणे ही देवी बसलेली आहे. देवीच्या बाजूला काळभैरवाच्या मुखाचा आकार सिद्ध झाला आहे. ‘कालभैरवाच्या चेहर्यामध्ये डोळे आणि मिशी’, असे दिसत आहे. काशी येथील कालभैरव जसा दिसतो, त्याप्रमाणे हा आकार सिद्ध झाला आहे.
अग्निहोत्र संपल्यानंतर देवी आणि कालभैरव यांचे दर्शन झाल्यानंतर समजले की, ‘गौरींचे आवाहन आजच आहे.’ देवीने साक्षात् त्या गोवर्यांवर बसून आजच्या शुभदिनी आम्हाला दर्शन दिले.’
– श्री. वाल्मिक भुकन, देहली (२२.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |