कट्टर हिंदुत्वनिष्ठ लेखन करणारे दादूमिया !

वर्ष १९७० पासून १९८० पर्यंतच्या कालावधीत साप्ताहिक ‘सोबत’ याचा मी एकही अंक वाचला नाही, असे घडले नाही. पुण्यातून निघणारे साप्ताहिक ‘सोबत’ याचे संपादक ग.वा. बेहेरे हे होते. या साप्ताहिकातील ग.वा. बेहेरे यांचे अग्रलेख आणि दादूमिया यांचे लेख हे अतिशय वाचनीय असत. दादूमिया हे नाव मुसलमान नाव वाटायचे; पण कट्टर हिंदुत्वनिष्ठ लेखन असायचे. राजकीय आणि सामाजिक परिस्थिती यांचे विलक्षण विश्लेषण दादूमियांच्या लेखात असायचे. आपणास दादूमियांच्या विश्लेषणाची तुलना करायची झाल्यास आपण ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांच्या ‘प्रतिपक्ष’ या ट्यूब चॅनेलद्वारे करण्यात येणार्‍या विश्लेषणाशी करू शकता.

दादूमियांचे मूळ नाव डाॅ. दामोदर विष्णू नेने असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील नूतन मराठी प्रशालेमध्ये झाले. त्यांचे वडील आणि आजोबा हे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे सचिव म्हणून होते. दादूमिया हे बडोद्यातच स्थायिक झाले होते. ते व्यवसायाने डॉक्टर होते आणि त्यांचे ९० टक्के रुग्ण मुसलमान असायचे. ते ‘कुराण’चे गाढे अभ्यासक होते.

दादूमिया

१. लाभावीण मैत्री

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, हिंददुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी, बाळासाहेब देवरस, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. इतक्या मोठमोठ्या राजकारणी नेत्यांशी त्यांचे संबंध असूनही त्यांनी व्यक्तीगत आयुष्यात व्यावहारिकदृष्ट्या कोणताही लाभ करून घेतला नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांची त्यांनी घेतलेली सडेतोड मुलाखत त्याकाळी गाजली होती.

२. ग्रंथसंपदा

‘गुजरातला जेव्हा जाग येते’, ‘दलितांचे राजकारण’, ‘द्रौपदीची मुलगी’, ‘धास्तावलेले मुसलमान’ ही त्यांची सामाजिक आणि राजकीय विषयावरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. त्यांनी ‘एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानीका’ हा त्यांचा १६ खंडाचा ज्ञानकोश त्यांनी लिहिला आहे. अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती साप्ताहिकात त्यांचे शेकडो लेख प्रसिद्ध झाले आहेत.

वर्ष १९२९ मध्ये पुण्यात जन्मलेल्या दादूमिया यांनी २१ मे २०२४ या दिवशी अखेरचा श्वास घेतला.

– अधिवक्ता अनिल रुईकर, इचलकरंजी, कोल्हापूर.