विशाल अग्रवाल यांच्या मुलामुळे शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली !

पुणे येथील कारच्या अपघातातील अल्पवयीन आरोपीविषयी सोनाली तनपुरे यांचा खुलासा !

पुणे – वेदांत अग्रवाल याच्या शाळेतील कृत्यांविषयी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी खुलासा केला आहे. विशाल अग्रवालच्या मुलामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली होती. सोनाली यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलासह काही मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडे केली होती; परंतु त्याची नोंद घेतली गेली नाही. शेवटी मी माझ्या मुलाला त्या शाळेतून काढून दुसर्‍या शाळेत शिकवल्याचे सोनाली यांनी सांगितले. (जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे हे मामा-भाचे आहेत. एवढे राजकीय संबंध असूनही हा बांधकाम व्यावसायिक आणि त्याचा मुलगा किती उद्दाम होता, हे यावरून दिसत आहे. – संपादक) सोनाली तनपुरे यांनी ट्वीट करून बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचा भांडाफोड केला आहे.

सोनाली यांनी नाव न घेता त्या मुलाचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणार्‍या मुलांची नोंद वेळीच घेतली गेली असती, तर असा भयंकर गुन्हा कदाचित् घडला नसता, असा गंभीर आरोप सोनाली तनपुरे यांनी केला आहे. त्या दिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण-तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणीही सोनाली यांनी केली आहे.