पुणे सत्र न्यायालयाच्या बाहेर विशाल अग्रवाल यांच्यावर ‘वंदे मातरम्’ संघटनेने शाई फेकली !

विशाल अग्रवालसह ३ जणांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे – येथे अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना सत्र न्यायालयाकडे आणले जात असतांना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. ‘वंदे मातरम्’ संघटनेने हे कृत्य केले. त्यामुळे सत्र न्यायालयाबाहेर गोंधळ झाला होता. पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखले. संघटनेच्या ५ ते ८ कार्यकर्त्यांनी ‘शाई फेक’ करण्याचा प्रयत्न केला. यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल, असे ‘वंदे मातरम्’ संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे म्हणाले.

ते म्हणाले की, अल्पवयीन मुलावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही आंदोलन केले. आरोपी विशाल अग्रवाल यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा. त्यांच्यावर याआधीच काही गुन्हे नोंद आहेत. त्यांच्या मुलापेक्षा अधिक विशाल अग्रवाल दोषी आहेत. त्यांनी मुलाला गाडी चालवण्यास का दिली ? त्याने मद्य प्यायले असतांना रिक्शा किंवा इतर गाडीने येण्यापेक्षा स्वत: गाडी का चालवली ?

पुणे कार अपघाताच्या प्रकरणी विशाल अग्रवालसह हॉटेल ‘कोझी’चे मालक नमन भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, तसेच ‘ब्लॅक’चे व्यवस्थापक संदीप सांगळे यांना सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे येथील ‘पोर्शे’ अपघात प्रकरणाची न्यायिक चौकशी करावी ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

पुणे येथील ‘पोर्शे’ गाडी अपघात प्रकरणी आरोपीला लाभ व्हावा, यासाठी पुणे पोलिसांनी पहिल्या एफ्.आय.आर्.मध्ये (प्रथम माहिती अहवाल) जाणूनबुजून अनेक त्रुटी ठेवल्या. यावरून पोलिसांच्या कृतीविषयी शंका उपस्थित होते. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाची (एस्.आय.टी.) नेमणूक केली, तशी या प्रकरणीसुद्धा न्यायिक चौकशी करावी. तसेच पुणे पोलिसांची चौकशी करावी, असे ‘ट्वीट’ विधानसभेचे (राष्ट्रीय काँग्रेसचे) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना धमक्या दिल्याची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती !

अपघातातील मृतांचे नातेवाईक आणि मित्र यांना धमकावल्याचे प्रकार आमच्या कानावर आले आहेत, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमितेश कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी आता आम्ही चौकशी चालू केली आहे; मात्र त्यांना धमकावल्याची तक्रार नातोवाइकांनी आतापर्यंत केलेली नाही. मृतांच्या नातेवाइकांशी वाईट वागणूक आणि या प्रकरणातील आरोपींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साहाय्य करणारे पोलीस कर्मचारी अन् अधिकारी यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

पुणे अपघातातील दोषींना कठोर शिक्षा करावी ! – अमृता फडणवीस यांची मागणी

अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना ! दोषी वेदांत अग्रवाल याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! बाल न्याय मंडळाच्या निर्णयाने पोलिसांसह आम्हालाही धक्का बसला आहे, बाल न्याय मंडळाला लाज वाटायला हवी’, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट केली आहे. अमृता फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून बाल न्याय मंडळावर रोष व्यक्त केला आहे.