दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पुढील ५ दिवस पावसाची चेतावणी !; अहिल्यानगर येथे कठ्याची यात्रा पार पडली !…

पुढील ५ दिवस पावसाची चेतावणी !

पुणे – राज्यात पुढील ५ दिवस पुणे वेधशाळेने उत्तर कोकण, दक्षिण मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ वगळता राज्यात पावसाची चेतावणी दिली आहे. ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रतिवेगाने वारे वहातील. कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस पडेल.


अहिल्यानगर येथे कठ्याची यात्रा पार पडली !

अहिल्यानगर – येथील अकोले तालुक्यातील कौठेवाडी या गावात बिरोबाची यात्रा म्हणजेच प्रसिद्ध कठ्याची यात्रा पार पडली. पेटलेल्या लाल निखार्‍याचे तेवत असलेले कठे, म्हणजे माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात. बोललेला नवस पूर्ण झाल्यावर अशा प्रकारची प्रदक्षिणा घातली जाते.


बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेची फसवणूक !

रत्नागिरी – येथे बनावट सोने बँकेत तारण ठेवून बँक ऑफ इंडियाची फसवणूक करण्यात आली आहे. १८ लाख २१ सहस्र रुपयांची अधिकोषाची फसवणूक करण्यात आली असून रत्नागिरी पूर्णगड शाखेकडून या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


खंडाळा (रायगड) येथील महिलांचा पाण्यासाठी मोर्चा !

खंडाळा (रायगड) – अलिबाग शहरापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावरील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील खंडाळे, ढोलपाडा, नेहुली गावासह रुळे, पवेळे, सागाव, मधला पाडा आदी गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी १८ ते २० दिवस वाट पहावी लागत आहे. एम्.आय.डी.सी.कडून अल्प दाबाने आणि ठराविक वेळेत मिळणारे पिण्याचे पाणी, तसेच विजेचा खेळखंडोबा, जलजीवन मिशन ठेकेदाराकडून रखडलेली कामे असल्याने खंडाळे गावातील महिलांनी २१ मे या दिवशी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.


नागपूर येथे वाळू तस्करांवर कारवाई; कोट्यवधी वसूल !

नागपूर – येथे वाळूतस्करांवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. नागपुरात वर्षभरात ४३३ कारवायांत सव्वासहा कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांची लूट होऊ नये, यासाठी राज्यशासनाने जून २०२३ मध्ये नवे धोरण लागू केले. यानुसार शासनाने डेपो सिद्ध करून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना रेती उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण केली.


छत्रपती संभाजीनगर येथे वाळूतस्कर्‍यांकडून पोलिसांना मारहाण !

छत्रपती संभाजीनगर – येथे वाळूतस्कर आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. वाळूतस्करी करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना वाळूतस्करी करणार्‍यांनी मारहाण केली.