शिरोडा येथील रहिवासी विकास वसंत नाईक शिरोडकर पोलिसांच्या कह्यात
मडगाव, २० मे (वार्ता.) – ३ मासांपूर्वी मडगाव येथील श्री दामोदर सालात झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा अखेर छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. या चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी शिरोडा येथील रहिवासी विकास वसंत नाईक शिरोडकर याला कह्यात घेतले आहे. पोलीस संशयिताची कसून चौकशी करत आहेत.
११ फेब्रुवारी २०२४ या दिवशी दिवसाढवळ्या शहरातील आबा दे फारिया मार्गावरील श्री दामोदर सालात चोरीची घटना घडली होती. सुशांत सिनारी यांनी या प्रकरणी फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. भारतीय दंड संहितेचे कलम ४५४ आणि कलम ३८० अंतर्गत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञाताने देवालयात शिरून मूर्तीवरील सोनसाखळी आणि सोन्याची अन्य एक वस्तू चोरून नेल्याचे नमूद केले होते. या ऐवजाची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. अटक केलेल्या विकास नाईक शिरोडकर याचा अन्य चोर्यांतही सहभाग असावा, असा पोलिसाना संशय आहे.
श्री देव बोडगेश्वर मंदिरात गूगलवरून माहिती मिळवून केली चोरी
२९ एप्रिल २०२४ या दिवशी उत्तररात्री म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिरात चोरी झाली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी संशयित मूळ बांगलादेशी आणि सध्या बंगाल येथे रहाणारा राजू फरत शेख, गुजरात येथील इम्रान शेख आणि राखीब शेख अन् झारखंड येथील मुजाहिद खान यांना महाराष्ट्रातील खापोली पोलिसांनी कह्यात घेतले होते. सध्या ते म्हापसा पोलिसांच्या कोठडीत आहेत. पोलिसांनी संशयितांच्या अन्वेषणानंतर दिलेल्या माहितीनुसार हे चारही संशयित अट्टल चोर आहेत. त्यांनी गूगलवरून गोव्यातील श्रीमंत मंदिरांची माहिती मिळवून आणि परिसराची पहाणी करून चोरी केली. धार्मिक स्थळांना लक्ष्य करून मंदिरांतील दानपेट्या फोडून रोख रक्कम आणि किमती वस्तू चोरणारी ही टोळी आहे. संशयितांनी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांतील मंदिरांना त्यांचे लक्ष्य बनवले होते.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षित ! |