पुणे – महापालिका प्रशासनाने नुकतीच शहराच्या कोथरूड, वारजे आणि वानवडी या परिसरांतील ९ बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करून ती पाडली. धोकादायक असलेल्या ७२ फलकांना नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती परवाना आणि आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. मुंबई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील ८५ होर्डिंग्ज बेकायदेशीर, तर ३४९ होर्डिंग्जचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (संरचनात्मक परीक्षण) झाले नाही. त्यामुळे मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’विना उभ्या असलेल्या होर्डिंग्ज आस्थापनांना नोटिसा देण्यास प्रारंभ झाला आहे.
गेल्या महिन्यात वाघोली परिसरातील रस्त्यावर होर्डिंग कोसळले होते. सुदैवाने त्या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु ऑक्टोबर २०१८ मध्ये पुणे येथील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात, तर पिंपरी-चिंचवडमधील किवळे येथे एप्रिल २०२३ मध्ये होर्डिंग कोसळून जीवितहानी झाली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग उभारण्याविषयी नियमावली सिद्ध करण्यात आली. त्यात भूमीपासून होर्डिंगची उंची निश्चित करण्यात आली आहे, तसेच नियमित कालावधीने या होर्डिंगच्या सांगाड्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे बंधन घालण्यात आले होते; परंतु होर्डिंग अस्थापनांनी या नियमावलीकडे दुर्लक्ष केले आहे. वार्यामुळे उंच होर्डिंग कोसळून अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर ही काळजी घेण्यात आली आहे.