|
नवी देहली – मालदीवने काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्यामुळे त्याला ते चांगलेच भोवले आहे. भारतियांनी मालदीववर बहिष्काराचे अस्त्र उगारल्याचा लाभ शेजारील श्रीलंकेला झाला. आता अनेक भारतीय श्रीलंकेला फिरायला जाऊ लागले आहेत. यामध्ये तब्बल २५० टक्क्यांची वाढ झाली आहे. ‘भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकल्याचा परिणाम म्हणून श्रीलंकेचा पर्यटन उद्योग वाढला आहे’, असे श्रीलंकेचे पर्यटनमंत्री हरिन फर्नांडो यांनी स्वत: म्हटले आहे.
१. श्रीलंकेत गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात १३ सहस्र ७५९ भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती; परंतु या वर्षीच्या जानेवारीत तीच संख्या ३४ सहस्र ३९९ झाली. गेल्या वर्षी फेब्रुवारीत १३ सहस्र ७१४ भारतीय श्रीलंकेला गेले होते, तर यावर्षी ही संख्या ३० सहस्र २७ झाली. साधारण अशा प्रकारचीच वाढ मार्च आणि एप्रिल महिन्यांत पहायला मिळाली.
२. दुसरीकडे जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ४२ सहस्र ६३८ भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पोचले. गेल्या वर्षी हीच संख्या ७३ सहस्र ७८५ होती. यातून मालदीवला जाणार्या भारतीय पर्यटकांची संख्या ४२ टक्क्यांनी अल्प झाली आहे.