अलिबाग – कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने याविषयीचे आदेश जारी केले आहेत. बंदीकाळात मासेमारी करणार्या मच्छीमारांवर कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
१. या कालावधीमध्ये मासळी आणि सागरी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होते. समुद्रात नद्यांद्वारे मोठ्या प्रमाणात खनिजद्रव्ये वहात जातात. त्याचप्रमाणे क्षारतेचे प्रमाण न्यून होते आणि समुद्राच्या तळातील मूलद्रव्ये पाण्याच्या वरच्या थरात येतात. त्यामुळे प्लवंग निर्मिती होऊन मासळीच्या लहान जिवांना पोषक वातावरण तयार होते. परिणामी मासळीच्या साठ्याचे जतन होते.
२. या कालावधीत वादळी हवामान असल्याने जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, या हेतूने मासेमारीस बंदी घालण्यात आलेली आहे.