आरंभी भौतिक आकर्षणाने साधना खंडित होते आणि दृढतापूर्वक साधना केल्यानंतर आनंद प्राप्त झाल्यामुळे ती अखंड होते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदुत्वनिष्ठ : मी विचार करतो की, ‘साधनेचा अमुक एक प्रयत्न करीन; परंतु तो विचार काही काळ गेल्यावर मनातून निघून जातो.’ मग वाटते, ‘आता उद्यापासून प्रयत्न करीन, परवा करीन; परंतु तो उद्या कधी उजाडत नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्या बुद्धीला वाटते, ‘मला साधनेचे महत्त्व समजले आहे, तर मी साधना करायला पाहिजे; परंतु मनात असे जे विचार रहातात ना, त्या वेळी मन आणि बुद्धी यांचे युद्ध होते. ५० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी झाली, तर मन आणि बुद्धी यांच्या या युद्धात बुद्धीला जिंकता येते. मायेचे (भौतिक जीवनाचे) अर्धे आकर्षण आणि ईश्वरप्राप्तीचे अर्धे आकर्षण रहाते. त्या अवस्थेत कधी असे वाटते की, ‘चला, ‘कामधंदा आणि चाकरीच करू, कधी वाटते की, साधनाच करूया.’ त्यामुळे साधनेत असे वर-खाली होत रहाते आणि ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत साधक पोचला, तर काय होते ? मनोलयाला आरंभ होतो. मनच नष्ट होऊ लागते. ७० टक्के पातळीला मनच नष्ट होते. पुढे गेल्यावर ७० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी प्राप्त केली की, तो संत होतो. ८० टक्के पातळीला बुद्धी नष्ट होते. या अवस्थेत मन राहिले नाही, बुद्धी राहिली नाही, तर काय होते ? तो साधक विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी एकरूप होतो. त्याचा प्रत्येक विचार ईश्वराचाच होतो.

आरंभी आपल्याला बुद्धीने साधनेचे महत्त्व ठाऊक होते. तेव्हा साधनेत हळूहळू थोडेसे वर-खाली होते. अशा अवस्थेत थोडे दिवस साधनेचे प्रयत्न केले, थोडे दिवस नाही केले, काही सप्ताह केले, नाही केले, असे वर-खाली होत रहाते. असे होता होता साधनेचा आलेख वर जातो आणि साधक ५० टक्के आध्यात्मिक पातळीला पोचला, तर त्याला ईश्वराची अनुभूती येऊ लागते. आनंदाची अनुभूती येऊ लागते आणि नंतर त्याला समजते की, आपल्याला पृथ्वीवर जे सुख मिळते, त्याला काही अर्थ नाही. आनंदाची तुलना, तर सुखाशी होऊच शकत नाही. साधनेतून मिळालेला आनंद त्याला साधनामार्गावर पुढे खेचतो आणि शेवटी त्याला १०० टक्के आध्यात्मिक पातळी, म्हणजे ‘सत्-चित्-आनंद’ अवस्था प्राप्त होते.