Fraud In Britain : ब्रिटन सरकारच्या निष्काळजीपणामुळे ४ सहस्र भारतीय परिचारिकांना मायदेशी परतावे लागणार !

सरकारने बनावट आस्थापनांना दिले होते परवाने !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये परदेशी लोकांना कामावर ठेवण्यासाठी प्रायोजक परवाना आवश्यक असतांना सरकारने कोणतीही ठोस चौकशी न करता शेकडो आस्थापनांना परवाने दिल्याचा आरोप केला जात आहे. सरकारने २६८ आस्थापनांना परवाने दिले, ज्यांनी कधीही आयकर भरलेला नाही, तसेच परवाने घेतलेली अनेक आस्थापने बनावट होती. सरकारच्या या निष्काळजीपणाचा फटका तेथील ४ सहस्र भारतीय परिचारिकांना (नर्स यांना) बसवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ज्या बनावट आस्थापनांना परवाने देण्यात आले होते, त्यांनीच भारतातून या परिचारिकांना ब्रिटनमध्ये आणले होते.

आता सरकार या परिचारिकांवर कारवाई करत आहे. या निर्णयाचा ७ सहस्रांहून अधिक परिचारिकांवर परिणाम होणार आहे. त्यांपैकी सर्वाधिक ४ सहस्र परिचारिका भारतातील आहेत. कारवाई करण्यात आलेल्यांपैकी ९४ टक्के प्रकरणे सरकारने आस्थापनांची नोंदणी रहित केल्यामुळे उघडकीस आली आहेत.

सरकारच्या चुकांचे बळी ठरत आहेत परिचारिका !

स्थलांतरितांना साहाय्य करणार्‍या ‘मायग्रंट अ‍ॅट वर्क’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अके आची यांच्या मते, भारतीय देश सोडून संधीच्या शोधात लाखो रुपयांचे कर्ज काढून येथे येतात. हे असे लोक आहेत, जे सर्व नियमांचे पालन करतात. त्यांचा कोणताही दोष नसतांनाही त्यांना शिक्षा होत आहे. आधी ते लाखो रुपयांच्या कर्जाचे बळी होते आणि आता ब्रिटन सरकारच्या चुकांचे बळी ठरत आहेत.