अलिबाग – भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. या संभाव्य दरडग्रस्त गावांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. दरडग्रस्त गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश ‘जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’च्या वैज्ञानिकांनी दिले आहेत. रायगडमधील ९ गावे (वर्ग १) अतिधोकादायक, ११ गावे (वर्ग २) धोकादायक व ८३ गावे वर्ग ३) सौम्य धोकादायक आहेत. १०३ दरडग्रस्त गावांमध्ये अनेक उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी भूवैज्ञानिकांनी केलेल्या सूचनांची कार्यवाही करायला हवी.
भूवैज्ञानिकांनी सुचवलेल्या उपाययोजना !
१. परिसरातील खाणकाम आणि उत्खननावर निर्बंध घालण्यात यावेत.
२. डोंगर उतारावर वृक्ष तोडण्यास मज्जाव करण्यात यावा.
३. पावसाळ्यापूर्वी डोंगर उतारावर सैल झालेले दगड हटवण्यात यावेत.
४. डोंगर उतारावरील पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात आणि दरडरोधक भिंतीची उभारणी करण्यात यावी.