|
नवी देहली – दूध घातलेला चहा किंवा कॉफी प्यायल्याने आरोग्यावर होणार्या वाईट परिणामाविषयीचा एक अहवाल ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषेद’ अर्थात् ‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे. ‘दूध घातलेला चहा प्यायल्याने अनेकांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यातूनच ‘ॲनिमिया’चा त्रास वाढतो’, असा निष्कर्ष या परिषदेने काढला आहे. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी दूध घातलेला चहा किंवा कॉफी तर घेऊ नयेच; पण जेवण किंवा नाश्ता यांच्याआधी आणि नंतर एक तास तरी चहा अन् कॉफी यांचे सेवन करू नये; कारण त्यामुळे आहारातील लोह रक्तात मिसळण्यास अडचणी येतात. त्यामुळे दूध घातलेला चहा पिणे टाळा, असा सल्ला ‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने दिला आहे.
‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार दिवसातून ३०० मिलीग्रॅम एवढे कॅफीन तुम्ही सेवन करत असाल, तर ते ठीक आहे. एक कप कॉफी प्यायल्याने एकावेळी तुमच्या शरीरात ८० ते १२० मिलीग्रॅम कॅफीन जाते. तसेच एक कप चहा प्यायल्याने त्यातून ३० ते ६५ मिलीग्रॅम कॅफीन पोटात जाते. दूध घालून केलेल्या चहा-कॉफीपेक्षा कोरा (बिनदुधाचा) चहा-कॉफी घेण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही ‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने केली आहे.