अहिल्यानगर येथे ‘श्रीमद् आद्य जगद्गुरु शंकराचार्य वारकरी भूषण’ पुरस्काराचे वितरण !

श्रीमद् जगद्गुरु आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त सोहळ्याचे आयोजन !

अहिल्यानगर, १६ मे (वार्ता) – येथील श्री संत पंढरी, पिंपळगाव वाघा येथे १२ मे या दिवशी दुपारी २ वाजता श्रीमद् जगद्गुरु आद्यशंकराचार्य जयंतीनिमित्त ‘श्रीमद् आद्य जगद्गुरु शंकराचार्य वारकरी भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे यांना पुरस्कार मिळाला. ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे (श्री क्षेत्र ओतूर) यांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री. अरुण (बापू) ठाणगे आणि संत चरण छगन महाराज मालुसरे (श्री क्षेत्र बाळनाथ गड) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील १५० गावांतून दिंड्या घेऊन वारकरी भाविक आले होते. या सोहळ्याच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन यांनी रामराज्याची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमास ३ सहस्रांहून अधिक वारकरी, धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी ह.भ.प. धर्माचार्य मारोती महाराज तुणतुणे (शास्त्री) श्री क्षेत्र पंढरपूर यांचे कीर्तन झाले.

१०० कोटी हिंदूंचे एकही राष्ट्र नाही ! – ह.भ.प. धर्माचार्य मारोती महाराज तुणतुणे (शास्त्री)

मार्गदर्शन करतांना तुणतुणे महाराज म्हणाले की, भारत म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी रममाण होणे. विदेशी लोकांना १ सेकंदापेक्षा लहान भाग करता आला नाही; परंतु आपल्या ऋषीमुनींनी एका सेकंदाचे ३५ भाग केले आहेत. गायीच्या शेणापासून सारवले तर अणुबाँबच्या रेडिएशनपासून रक्षण होते. जगामध्ये १२० पेक्षा अधिक ख्रिस्ती देश आहेत, तर ५० हून अधिक मुसलमान राष्ट्रे आहेत; परंतु १०० कोटी हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. यासाठी आपल्या सर्वांना भारत हे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

वारकरी संप्रदायाला अद्वैताची बैठक शंकराचार्यांनी दिली ! – श्री कृष्णकृपांकित विकासानंदजी महाराज मिसाळ

श्री कृष्णकृपांकित विकासानंदजी महाराज मिसाळ (श्री क्षेत्र संत पंढरी) कीर्तन करतांना महाराज म्हणाले की, आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी भारतात ४ पिठांची स्थापना केली. महाराष्ट्रामध्ये आद्य शंकराचार्य यांचा जयंती सोहळा चालू व्हावा, याच उद्देशाने हे कार्य चालू आहे. वारकरी संप्रदायाला अद्वैताची बैठक शंकराचार्यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या घराघरात वारकरी संप्रदाय आहे, त्या सर्व वारकर्‍यांना जगद्गुरु शंकराचार्यांचे सनातन धर्मावरील अनंत उपकार कळावेत आणि महाराष्ट्रात साजर्‍या होणार्‍या सणांमध्ये वैदिक धर्माविषयीचा जागर व्हावा, हेच प्रयत्न भगवंत करून घेत आहे.