महिला शौचालयाचा प्रश्न !

जागतिक वारसा स्थळाच्या सूचीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील महिला शौचालय स्वच्छतागृहाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आल्याने ते बंद करण्यात आले आहे. पर्याय म्हणून रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १४ आणि १५ वरील शौचालय वापरण्याची मुभा दिली आहे; पण महिला प्रवाशांना स्वतःचा शरीरधर्म उरकण्यासाठी पुढच्या प्रवासाला जाण्यापूर्वी २ गाड्या सोडाव्या लागत आहेत. परिणामी मिनिटभराच्या नैसर्गिक विधीसाठी महिलांना अर्धा-एक घंटा खर्ची करावा लागत आहे, हे गणित रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येत नाही. यातून रेल्वे प्रशासनाची असंवेदनशील वृत्ती लक्षात येते. मुंबई रेल्वे स्थानकात महिलांना त्यांच्या नैसर्गिक विधीचीही सोय मिळू शकत नाही, ही किती मोठी शोकांतिका म्हणावी लागेल ?

लांबपल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वेगाड्यांतील महिला प्रवाशांना या एकाच स्वच्छतागृहावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे सध्या या स्वच्छतागृहात प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. परिमाणी महिला प्रवाशांना घरी पोचण्यास विलंब होत आहे. शरीरधर्म उरकण्याच्या नादात वेळेचे गणित बिघडत असल्याने महिला पर्यायी स्वच्छतागृहाचा वापर न करता अडलेल्या परिस्थितीतच घर गाठतात; पण इच्छित स्थानकावर उतरल्यावरही महिलांना लागलीच स्वच्छतागृह सापडेलच, याचीही निश्चिती नाही. जागतिक वारसा स्थळाच्या सूचीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची ही अवस्था असेल, तर मुंबई उपनगरांतील लहान-मोठ्या रेल्वेस्थानकांची अवस्था न पाहिलेलीच बरी. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशा या सुविधेसाठी खरे तर महिला, अपंग यांचा प्राधान्याने विचार व्हायला हवा; पण आपल्या सार्वजनिक व्यवस्थेत महिलांची सोय विचारातच घेतली जात नाही, हे दुर्दैव आहे. महिलांसाठी शौचालय असणे, ही अत्यंत मूलभूत आवश्यकता आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह आणि महिलांचे आरोग्य हा विषय कायम चर्चेत असतो; पण म्हणून त्यावर पूर्ण तोडगा निघालेला नाही. आज महिला जेवढ्या प्रमाणात घराबाहेर पडून काम करतात, तेवढ्या प्रमाणात त्यांच्यासाठी बाहेर स्वच्छतागृहांची सोय नाही. यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आंदोलने केली. आज जेवढी सार्वजनिक स्वच्छतागृहे महिलांसाठी म्हणून उपलब्ध आहेत, ती वापरण्याचीही अनिच्छा व्हावी, इतकी परिस्थिती वाईट आहे. त्याचा महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. परदेशात ठराविक अंतराने शौचालये असतात. भारतात महिलांसाठी शहरातील स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांची कमतरता ही फक्त एक समस्या नाही, तर एक गुन्हा आहे, जो आता थांबलाच पाहिजे. त्यामुळे महिलांनीच याविषयी आवाज उठवायला हवा !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे