सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री. सत्यकाम कणगलेकर यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट

मागील साधारण २ वर्षांच्या कालावधीचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आले की, ‘माझे मन श्री गुरूंच्या कृपेने शांत झाले आहे. मनात विचारांचे काहूर नसते. माझा स्वतःच्या जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पुष्कळ पालटला आहे. श्री गुरुकृपेने माझ्यामध्ये झालेले पालट पुढे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘‘स्वेच्छेतून परेच्छा आणि त्यापुढे ईश्वरेच्छा असा प्रवास करायचा आहे’’, असे सांगणे

श्री. सत्यकाम कणगलेकर

एकदा गुरुदेवांच्या सत्संगात त्यांनी मार्गदर्शन करतांना मला सांगितले, ‘‘स्वेच्छेतून परेच्छा आणि त्यापुढे ईश्वरेच्छा असा प्रवास करायचा आहे.’’ त्यांनी सांगितलेले सूत्र माझ्या मनात बसले; पण ‘ते साध्य कसे करायचे ?’, ते लक्षात येत नव्हते.

२. साधकांना दैनंदिन आश्रमसेवा करण्यास अडचण असतांना मला विचारल्यावर आरंभी होणारा संघर्ष न्यून होऊन गुरुकृपेमुळे ‘समोर आलेला प्रसंग आहे तसा स्वीकारणे’, ही ईश्वरेच्छेची पहिली पायरी आहे’, असे लक्षात येणे

काही वेळा काही साधकांना त्यांच्या इतर सेवांच्या प्राधान्यामुळे त्यांच्याकडील आश्रमसेवा करणे शक्य नसते. अशा वेळी ते मला तडजोड करण्यासाठी विचारतात. आरंभी १० ते १२ दिवस तडजोड करतांना माझ्या मनाचा संघर्ष झाला; मात्र त्यातून माझ्या लक्षात आले की, ‘ज्या ज्या वेळी तडजोड केलेली असते, त्या त्या वेळी माझ्या इतर सेवांची तडजोड आपोआप होत असे. याउलट जेव्हा मी तडजोड करत नसे, तेव्हा अनेक सेवा एकत्र येऊन स्वतःच्या वेळेचे नियोजन करणे मला कठीण होत असे. काही वेळा सलग २ – ३ सेवाही कराव्या लागत असत. अशा विविध प्रसंगांतून गुरुदेवांनी मला ‘समोर आलेला प्रसंग आहे तसा स्वीकारण्याचे शिकवून ही ईश्वरेच्छेची पहिली पायरी आहे’, असे लक्षात आणून दिले. त्यानंतर प्रत्येक प्रसंग काहीतरी नवीन शिकण्यासाठी समोर आला असून त्यातून शिकण्यातील आनंद घेता येत आहे.

३. सर्वकाही गुरुदेवांवर सोपवल्यामुळे वर्तमानकाळात रहाण्याचे प्रमाण वाढणे

‘जे होऊन गेले, ते पालटता येत नाही, जे होणार आहे, त्यावर माझे नियंत्रण नाही; मात्र वर्तमानकाळात मी गुरूंना अपेक्षित असणारी आणि त्यांनी शिकवल्यानुसार कृती करू शकतो’, एवढेच माझ्या हातात आहे. तेवढेच करायचे, बाकी सर्व गुरु पहातील’, असा मनाचा निश्चय होत आहे. त्यामुळे वर्तमानकाळात रहाण्याचे प्रमाणसुद्धा वाढल्याचे माझ्या लक्षात आले.

४. ‘परात्पर गुरुदेव आपल्या रोमरोमांत वास करत आहेत, तर त्यांना प्रत्यक्ष स्थुलातून भेटण्याची स्वेच्छा नको’, असे वाटणे 

एका प्रसंगात एका साधिकेने, ‘‘तुला गुरुदेवांना भेटावे’, असे वाटत नाही का ?’’, असे मला विचारले. तेव्हा मी तिला सांगितले की, ‘भेट झाली, तर आनंद आहे आणि नाही झाली, तरी आनंदच आहे.’’ माझ्या मनातील खरे उत्तर होते की, ‘जर गुरुदेव आपल्या रोमरोमांत वास करतात, तर त्यांना परत स्थुलातून काय भेटायचे ? आणि ही स्वेच्छा तरी कशासाठी ? केवळ या विचारानेच माझी भावजागृती झाली.

५. काही प्रसंगांत अडचणी येत असतांना  गुरुदेवांशी सूक्ष्मातून संभाषण झाल्यावर त्यांनीच पुढील उपाय सुचवणे

बर्‍याच वेळा काही प्रसंगांमध्ये ‘नेमकी कोणती दिशाघ्यावी ? किंवा या संदर्भात कोणाला विचारावे ?’, हे कळत नाही. अशा वेळी गुरुदेवांशी सूक्ष्मातून संभाषण होते. त्यांना मी सर्व प्रसंग सांगतो. त्यामुळे माझे मन हलके होते आणि सूक्ष्मातून गुरुदेवांच्या चरणी सर्वकाही अर्पित झाल्यामुळे तेच ‘पुढे काय करायचे ?’, हे सुचवतात. त्यानुसार कृती केल्यावर त्यातून उपाय निघतात. बर्‍याच वेळा प्रलंबित राहिलेल्या सूत्रांची उत्तरेही मिळतात. त्यामुळे माझे मन अस्थिर होत नाही आणि सेवाही चांगली होते.

६. मन मायेच्या विचारांकडे न धावता आनंद, समाधान आणि स्थिरता अनुभवता येणे

या २ वर्षांच्या कालावधीत ‘मनात येणारे विचार नाहीसे झाले आहेत’, असे नाही. अनेक वेळा मायेचे विचारसुद्धा मनात येतात; परंतु मन त्या विचारांमागे धावत नाही. त्या विचारांमुळे विकार उत्पन्न होत नाहीत आणि मनाचा आनंद हरवत नाही. त्यामुळे मला समाधान आणि स्थिरता जाणवते.

‘श्री गुरूंच्या अपार कृपेने हे सर्व समजले, त्यांनी ती बुद्धी दिली आणि त्यांच्या सेवेत ठेवले आहे, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२५.१.२०२४)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक