इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये देशाचा सन्मान हरवला होता. आतंकवाद वाढला आणि भ्रष्टाचार बोकाळलेला होता; परंतु १० वर्षांच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारने ही प्रतिमा पुसून काढली. आता भारताचा सन्मान वाढला असून जगभरात मोदींचा सन्मान केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून मुसलमानांचे तुष्टीकरण केले जात आहे. त्यांच्यासाठी कायदे पालटण्याची भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते इचलकरंजी येथे हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
योगी आदित्यनाथ यांनी मांडलेली ठळक सूत्रे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येमध्ये श्रीराममंदिर साकारले; परंतु काँग्रेस मूळ प्रवृत्ती सोडायला सिद्ध नाही. श्रीराममंदिर बांधण्यापूर्वी याची आवश्यकता काय म्हणत होते, तर श्रीराममंदिर साकारल्यानंतर श्रीराम सगळ्या देशाचा आहे, असे म्हणत आहेत. काँग्रेसचा हा दुटप्पीपणा हिंदूंनी ओळखून त्यांना धडा शिकवला पाहिजे.
काँग्रेस पक्षाने नेहमी खोटी स्वप्ने दाखवली. इंदिरा गांधी ‘देशातील गरिबी हटवणार’, असे नेहमी म्हणत. आता त्यांचा नातू राहुल गांधी देशातील गरिबी दूर करणार, असे सांगत आहे. देशातील संपत्तीचे पुनर्मूल्यमापन करून ते मुसलमानांनाच वाटणार, असे त्यांचे नेते म्हणत आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये आम्ही ८० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महाराष्ट्रातही महायुतीच्या सर्व उमेदवारांना नागरिकांनी विजयी करावे. या प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, पुंडलिक जाधव यांसह अन्य उपस्थित होते.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सांगली येथे सभा
काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली, तर जातीजातींत विभाजन करील !
सांगली, २ मे (वार्ता.) – जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची घोषणा करून काँग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली, तर काँग्रेस जातीजातींत विभाजन करण्याचे काम करील, असा घणाघात काँग्रेसवर योगी आदित्यनाथ यांनी येथे केला. सांगली लोकसभेतील भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची १ मे या दिवशी येथील चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘महाविजय संकल्प सभा’ पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.
१. शूरविरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख आहे. या भूमीला मी वंदन करतो. सांगलीची भूमी संस्कृतीवर गौरवाची अनुभूती करत पुढे जात आहे. भारतीय परंपरेला भक्कम करण्याचे काम करत आहे. सांगलीची भूमी ही शौर्य, पराक्रम आणि कलेची भूमी आहे.
२. सैनिकांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. देशावर कुठले संकट आले, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी देश सोडून जातात. कोरोनाच्या काळात राहुल गांधी इटली येथे निघून गेले.
३. राहुल गांधी परदेशात भारताचा अवमान करतात. ‘सबका साथ सबका विकास’ पंतप्रधान मोदींचा मंत्र होता. त्यामुळे १० वर्षांत अनेक गोष्टी पालटून गेल्या आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक राष्ट्रीय महामार्ग बांधले. आज देशात दुप्पट महामार्ग झालेले आहेत. आधी ५ शहरांमध्ये मेट्रो धावत होती. आज २० शहरांमध्ये मेट्रो धावत आहे.
४. काँग्रेस गोहत्येला कायदेशीर करू इच्छित आहे. गोमांस खाण्याला प्रोत्साहित करू इच्छित आहे. हे तुम्ही स्वीकार कराल का ? हिंदु समाजात फूट पाडणे, हा काँग्रेसचा उद्देश आहे.
या सभेला जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव आणि मिरज या भागांतून मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आले होते. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी यांची उपस्थिती होती.