मीरारोड येथील दंगलीनंतरचे प्रकरण !
मुंबई – प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नीतेश राणे आणि मीरा भाईंदर येथील अपक्ष आमदार गीता जैन यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. २३ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांनी ही माहिती दिली.
जानेवारी महिन्यात अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या आदल्या दिवशी मीरारोडमधील नयानगर येथे काही मुसलमानांनी हिंदूंच्या गाड्यांची तोडफोड केली, तसेच काही हिंदु युवकांना मारहाणही केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंदवला. या ठिकाणी हिंदूंना धीर देण्यासाठी आमदार नीतेश राणे आणि गीता जैन नयानगर येथे आले असतांना त्यांनी धार्मिक तणाव निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याची तक्रार काही मुसलमानांनी पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी गुन्हा न नोंदवल्यामुळे तक्रारदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याविषयी याचिकाही केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांकडे कारवाईविषयी विचारणा केली होती. त्यानंतर पोलिसांनी नीतेश राणे आणि गीता जैन यांवर गुन्हे नोंदवले आहेत.