वसंत ऋतू असे सर्व ऋतूंचा राजा ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना वसंत ऋतुबद्दल सुचलेली कविता येथे देत आहोत.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

चैत्र मासात वसंत ऋतूचे होते आगमन ।
वसंतासह होते नवीन वर्षाचेही शुभागमन ।। १ ।।

वसंताचे सौंदर्य पहाण्यासाठी आसुसतात सारे नयन ।
त्याच्या स्वागतासाठी कोकीळ करी मंजूळ स्वरांत गायन ।। २ ।।

वसंत ऋतूत येतो आम्रवृक्षांना नवीन मोहर ।
चिंचा, आवळे आणि कैर्‍या यांचा येतो बहर ।। ३ ।।

चैत्राचा आरंभ होतो गुढीपाडव्याने ।
मन आनंदित होते श्रीरामनवमीच्या सणाने ।। ४ ।।

त्यानंतर येते श्री हनुमान जयंतीची शुभतिथी ।
अक्षय्य तृतीयेची असे अक्षय्य महती ।। ५ ।।

वृक्ष-लतांच्या नवपालवीने पृथ्वी सजते ।
निसर्गसौंदर्य पाहूनी अतीव तृप्ती लाभते ।। ६ ।।

मनास नवी ऊर्जा आणि संतुष्टी लाभते ।
त्यामुळे जीवनाकडे पहाण्याची दृष्टी पालटते ।। ७ ।।

कवीमनामध्ये प्रतिभेचा नवीन मोहर फुलतो ।
वसंत ऋतूच्या बहराने निसर्गही आनंदाने डोलतो ।। ८ ।।

मोगर्‍याच्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतो ।
पिवळसर केशरी रंगांचा गुलमोहरही सर्वत्र बहरतो ।। ९ ।।

वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी पल्लवित होते ।
सृष्टी सौंदर्य पाहून जीवन उल्हासित होते ।। १० ।।

मंत्रमुग्ध होते मन सृष्टीच्या सौंदर्याचे अवलोकन करून ।
हर्षित होते अंतरंग रंगीबेरंगी फुले पाहून ।। ११ ।।

वसंत घेतो सर्व प्राणीमात्रांचे मन स्वतःकडे मोहून ।
त्यामुळे सर्व जीव तृप्त होतात या चैतन्यात न्हाऊन ।। १२ ।।

निसर्गराजा वसंत ऋतूच्या रथात स्वार होऊन येतो ।
अन् वसंताच्या रूपाने पृथ्वीला आनंद देऊन जातो ।। १३ ।।

‘ऋतुराज’ वसंत असे सर्व ऋतूंचा राजा ।
ऋतुराजामुळे हर्षित होते पृथ्वीवरील प्रजा ।। १४ ।।

वसंत ऋतू असे निसर्गाला मिळालेले दैवी वरदान ।
त्यामुळे सृष्टीला लाभते नैसर्गिक सौंदर्य छान ।। १५ ।।

म्हणूनी भगवान श्रीकृष्ण वदती, ‘सर्व ऋतूंमध्ये मी वसंत असे’ ।
‘सर्व ऋतुंपैकी वसंत ऋतुमध्ये माझा नित्य वास असे’ ।। १६ ।।

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (वय ४० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२४)