सप्तश्रृंगी गडावर भेसळयुक्त बर्फीची विक्री करणार्‍या ५ दुकानदारांवर कारवाई !

५ लाख रुपयांचा भेसळयुक्त पेढा जप्त !

नाशिक – अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सप्तशृंगी गडावर मावा पेढ्याच्या नावाखाली भेसळयुक्त बर्फी विक्री करणार्‍या ५ दुकानदारांवर कारवाई केली आहे. यात २ सहस्र किलो बनावट मावा पेढा आणि मिठाईल असा एकूण ५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मयुरी पेढा सेंटर, भगवती पेढा सेंटर, अभिषेक पेढा सेंटर, मयूर पेढा सेंटर आणि मे. भगवती पेढा सेंटर अशी त्या दुकानांची नावे आहेत.

अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने धार्मिक स्थळांच्या यात्रेच्या ठिकाणी आणि चैत्रोत्सव २०२४ निमित्त यात्रेच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कार्यवाही करण्याविषयाची मोहीम हाती घेतली आहे.

सप्तश्रृंगी गडावर भेसळयुक्त पेढ्याची विक्री !

प्रशासनाकडून त्र्यंबकेश्‍वरनंतर जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी येथील सप्तश्रृंगगड येथे अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी अचानक धाड घालून पडताळणी केली. सप्तश्रृंगगडाच्या ‘रोप-वे संकुल परिसरा’त ग्राहकांची दिशाभूल करून मावा पेढे, कंदी पेढे, मलई पेढे आणि कलाकंद पेढे, हलवा, कलाकंद, स्पेशल बर्फी आणि इतर तत्सम् पदार्थ हे दुग्धजन्य पदार्थांपासून सिद्ध केले असल्याचे भासवून विकत असल्याचे आढळून आले.