प्लास्टिकमुळे मानसिक आरोग्याचीही होत आहे हानी ! – संशोधनाचा निष्कर्ष

नवी देहली – ‘एन्व्हायर्नमेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्ह जर्नल’मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, प्लास्टिकचे छोटे कण, ज्यांना मायक्रोप्लास्टिक म्हटले जाते ते मानसिक आरोग्याला प्रचंड हानी पोचवत आहेत.

१. न्यू मेक्सिको विद्यापिठातील संशोधकांनी त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्लास्टिकचे छोटे कण शरिरातील यकृत, मूत्रपिंड आणि मेंदू या महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोचून त्यांची हानी करत आहेत. याचे दीर्घकाळात गंभीर परिणाम होऊ शकतात.

२. कानपूरचे न्यूरोफिजिशियन (मेंदू आणि पचन संस्था यांचे डॉक्टर) डॉ. अनिमेश गुप्ता यांच्या मते, प्लास्टिक सर्वप्रथम त्वचा, श्‍वास आणि अन्न यांद्वारे शरिरात प्रवेश करते. मग ते रक्तात मिसळते आणि हळूहळू सर्व अवयवांमध्ये जमा होते. अवयवांमध्ये जमा होणारे प्लास्टिकचे कण फारच लहान असतात. त्यांचा आकार २० मायक्रोमीटरपेक्षा अल्प आहे. त्यानंतरच ते सर्व अडथळे पार करून यकृत, मूत्रपिंड आणि मेंदू या अवयवांपर्यंत पोचतात. या कणांचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे ‘पार्किन्सन्स’सारख्या (मेंदूच्या संबंधित आजार) आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो.

३. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार मायक्रोप्लास्टिक्समुळे आतड्याचे आरोग्यही बिघडू शकते.

४. ‘जर्नल ऑफ नॅनोबायोटेक्नॉलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अलीकडच्या वर्षांत, पॉलिस्टीरिन मायक्रोप्लास्टिक्स हे मूत्रपिंडात जळजळ होण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि ते ऑक्सिडेटिव्ह (श्‍वसनाच्या संदर्भातील तणाव) तणाव देखील वाढवत आहेत. ही स्थिती दीर्घकाळ टिकून राहिल्यास मूत्रपिंडाचा आजार होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे नंतर ते निकामी होऊ शकते.

५. ‘सायन्स डायरेक्ट जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, श्‍वासोच्छवाद्वारे  विरघळणारे प्लास्टिकचे कण फुफ्फुसांपर्यंत पोचतात. प्लास्टिकमध्ये असलेल्या विषारी घटकांमुळे दमा आणि फुफ्फुसाचा कर्करोग यांचा धोका वाढतो.

६. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, प्लास्टिक हे न्यूरोटॉक्सिक आहे. याचा अर्थ ते पेशींच्या कार्यावर परिणाम करू शकतात आणि त्यांचा नाशही करू शकतात. यामुळे कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो.

७. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, प्रतिवर्षी मानव जगभरात ४३ कोटी मेट्रिक टन प्लास्टिक निर्माण करत आहे. ज्यामध्ये दोन तृतीयांश प्लास्टिक असे आहे जे लवकरच कचरा बनते; पण ते नष्ट होत नाही.

८. प्लास्टिकचा सर्वांत मोठा तोटा म्हणजे ते नष्ट होत नाही. ते सहस्रो वर्षे निसर्गात राहून पर्यावरणाला हानी पोचवते. प्लास्टिक मातीत मिसळते आणि पिकांना अन् झाडांना हानी पोचवते. पाण्यात गेल्याने मासे आणि जलचर यांचे आरोग्य बिघडते.

९. वर्ष २०६० पर्यंत प्लास्टिकचे उत्पादन ३ पटींनी वाढू शकते आणि त्यासमवेत प्लास्टिक कचराही वाढेल.

संपादकीय भूमिका

प्लास्टिकमुळे आरोग्याची सर्व प्रकारे हानी होत आहे, हे जर स्पष्ट झाले आहे, तर आता त्यावर जागतिक स्तरावर बंदी घालणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा !