हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

मुंबई : श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.

पुणे येथे गदापूजनाला उपस्थित सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक

या कार्यक्रमांचा प्रारंभ शंखनादाने झाला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम: ।’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतिरायांचे गुण कसे आत्मसात करावेत ?’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदूंनी मारुतिरायांप्रमाणे भक्ती अन् शौर्य वाढवणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

या ‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, युगानुयुगे मारुतिरायांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते, ती म्हणजे त्यांची ‘गदा’ ! याच दैवी गदेने मारुतिरायांनी अनेक बलाढ्य असुर आणि राक्षस यांचा संहार करून प्रभु श्रीरामचंद्रांच्या ‘रामराज्या’साठी मोठे योगदान दिले. महाभारताच्या युद्धातही अर्जुनाच्या रथाच्यावर विराजमान होऊन पांडवांना धर्मयुद्ध जिंकण्यात दैवी सहाय्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठीही समर्थ रामदासस्वामींनी ११ मारुतींची स्थापना करून मावळ्यांकडून बलोपासना करवून घेतली. आता पुन्हा अयोध्येत ५०० वर्षांनंतर एकदा श्री रामलल्ला विराजमान झाले आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदूंनी मारुतीरायांप्रमाणे भक्ती अन् शौर्य यांची उपासना करणे आवश्यक आहे. हाच उद्देश ठेवून हनुमान जयंतीनिमित्त सर्वत्र ‘गदापूजनाचे’ आयोजन केले आहे.

महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन

गदापूजन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट
यवतमाळ येथील गदापूजन

गदापूजनाचे कार्यक्रम मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ यांसह महाराष्ट्रभरात ६४२ ठिकाणी झाले. पुणे येथील गदापूजन कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

गोवा राज्यात ३० ठिकाणी, कर्नाटकात ४१, बंगाल १०, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे एकूण १४, नवी दिल्ली, हरियाणा आणि उत्तरप्रदेश येथे एकूण २० असे देशभरात एकूण ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन झाले.