भारताने सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक पावले उचलली ! – अमेरिका

लेफ्टनंट जनरल जेफरी क्रूस

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास येत असून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्याने आवश्यक पावले उचलली आहेत, असे वक्तव्य अमेरिकेच्या गुप्तचर संरक्षण विभागाचे संचालक लेफ्टनंट जनरल जेफरी क्रूस यांनी केले. ते अमेरिकेच्या संसदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी भारताने चीनशी स्पर्धा करण्यासाठी आणि रशियाच्या शस्त्रांवरील अवलंबित्व अल्प करण्यासाठी स्वतःच्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी पावले उचलली.

जेफरी क्रुस यांनी मांडलेली अन्य सूत्रे !

१. गेल्या एका वर्षात भारताने जी-२० च्या आर्थिक परिषदेचे आयोजन करून स्वत:ला जागतिक नेता म्हणून सिद्ध केले आहे. यासह चीनच्या संपूर्ण इंडो-पॅसिफिक प्रदेशात चालू असलेल्या मोहिमांशी दोन हात करण्याची सिद्धताही दर्शवली.

२. सहकार्य, प्रशिक्षण आणि संरक्षण विक्री यांद्वारे फिलीपीन्ससारख्या प्रादेशिक शक्तींसमवेत भारत अधिकाधिक भागीदारी करत आहे. भारताने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जपान यांच्याशीही क्षेत्रीय सहकार्य वाढवले आहे.

३. प्रमुख संरक्षण तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावरून त्याने अनेक पाश्‍चात्त्य देशांशी चर्चाही केली.

४. रशिया-युक्रेन युद्धाविषयी भारताने त्याची भूमिका दोन्ही बाजूंनी सारखीच ठेवली आहे. रशिया हा भारताचा सर्वांत मोठा संरक्षण भागीदार आहे. संरक्षण खरेदी भागीदारीमध्ये विविधता आणण्याची इच्छा असूनही भारत रशियाकडून ‘एस्-४००’ या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली यांसारखी शस्त्रे मिळवत आहे.

५. काश्मीर प्रश्‍नावर भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह आंतरराष्ट्रीय समर्थन मिळायला हवे. (काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून तो सोडवण्यास भारत समर्थ आहे, हे भारताने अमेरिकेला ठणकावून सांगितले पाहिजे ! – संपादक)

६. आर्थिक संकट असूनही पाकिस्तानने आण्विक आधुनिकीकरणाचे प्रयत्न चालू ठेवले आहेत.

७. भारत आणि चीन यांच्यातील जून २०२० मधील संघर्षात भारताचे २० आणि चीनचे किमान ५ सैनिक मारले गेले होते. (एकीकडे भारताचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे खोटे आकडे सादर करायचे ! ही अमेरिकेची जुनी खोड आहे. गलवान खोर्‍यात प्रत्यक्षात भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले होते, तर भारतीय सैन्याने किमान ६० चिनी सैनिकांना ठार केले होते ! – संपादक) दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय संरक्षण अधिकार्‍यांच्या बैठका निष्फळ ठरत आहेत. दोन्ही देशांच्या सीमांवर त्यांचे ५० सहस्र ते ६० सहस्र सैनिक तैनात असून सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा वाढवण्याचा उभय देशांचा प्रयत्न चालू आहे.