कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे मुंबईतील प्राध्यापक महिलेची १ लाख रुपयांची फसवणूक !

मुंबई – येथील एकाने ५८ वर्षीय प्राध्यापक महिलेची कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून १ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. पीडित महिलेने फसवणूक करणार्‍याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

महिलेला अज्ञात क्रमांकावरून भ्रमणभाष आला. मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून संबंधिताने संपर्क केला. त्याने सांगितले, ‘‘आम्ही तुमच्या मुलाला एका प्रकरणात कह्यात घेतले आहे. तातडीने १ लाख रुपये भरा, नाहीतर त्याला अटक केली जाईल.’’ महिलेने घाबरून मुलाला संपर्क केला; पण त्याने भ्रमणभाष न उचलल्याने त्याला पोलिसांनी कह्यात घेतल्याचा तिचा समज झाला. त्यामुळे तिने संबंधित खात्यावर १ लाख रुपये भरले. काही मिनिटांनी मुलाने संपर्क केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी महिलेने जुहू पोलीस स्थानकात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

आरोपींनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून प्राध्यापिका आणि त्यांचा मुलगा यांची माहिती सामाजिक संकेतस्थळावरून मिळवली. या माहितीचा वापर करून वरील प्रकारे फसवणूक करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

बहुतांश सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येते, ही वस्तूस्थिती आहे. त्यात आता सायबर तंत्रज्ञानाच्याही पुढचे तंत्रज्ञान असलेल्या कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे करण्यात येणारे गुन्हे पोलीस कसे रोखणार ?