|
लंडन/नवी देहली – ‘भारतीय आणि पाकिस्तानी गुप्तचरांनी ‘द गार्डियन’ला सांगितले की, ‘भारत सरकारने परदेशी भूमीवर रहाणार्या आतंकवाद्यांना नष्ट करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमधील अनेक लोकांची हत्या केली’, असे वृत्त ब्रिटीश वर्तमानपत्र ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या हत्या करणे भारताच्या परराष्ट्र धोरणात बसत नाही.’’ त्याच वेळी परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हे आरोप खोटे असून भारताच्या विरोधात अपप्रचार केला जात आहे.
‘द गार्डियन’च्या बातमीत लिहिले आहे की,
१. दोन्ही देशांच्या गुप्तचर अधिकार्यांच्या मुलाखती आणि पाकिस्तानी अन्वेषण यंत्रणांकडून मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येते की, भारताच्या विदेशी गुप्तचर संस्थेने वर्ष २०१९ नंतर कथित राष्ट्रीय सुरक्षा कारवाया कशा केल्या आहेत. ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ (रॉ) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या नियंत्रणात आहे. मोदी या महिन्यात तिसर्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवत आहेत.
२. वर्ष २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील आक्रमणापासून भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ने २० हत्या केल्या आहेत. भारताने या सर्वांना शत्रू मानले आहे. नुकतेच भारतावर कॅनडा आणि अमेरिका येथे शिखांच्या हत्येचा आरोप आहे. भारतीय गुप्तचर अधिकारी पाकिस्तानमधील भारतीय कारवायांवर बोलण्याची ही पहिली घटना आहे.
३. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी सांगितले की, या हत्या संयुक्त अरब अमिरातमधील भारतीय गुप्तचरांनी केल्या आहेत. वर्ष २०२३ मध्ये हत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. हे गुप्तचर स्थानिक गुन्हेगारांना किंवा गरीब पाकिस्तानी लोकांना हत्या करण्यासाठी लाखो रुपये देतात. वष २०२३ मध्ये १५ लोकांची हत्या करण्यात आली होती. त्या सर्वांना अज्ञातांनी जवळून गोळ्या घातल्या होत्या.
४. भारतीय गुप्तचर यंत्रणेने आम्हाला सांगितले की, अशी कारवाई करण्यासाठी सरकारची अनुमती आवश्यक आहे. हे करण्यासाठी भारताला इस्रायली गुप्तचर संस्था ‘मोसाद’ आणि रशियाची गुप्तचर संस्था ‘केजीबी’ यांच्याकडून प्रेरणा मिळाली. या दोन्ही यंत्रणा परदेशी भूमीत होणार्या हत्यांशी संबंधित आहेत.
|
कुणीही आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देऊ. कुणी भारतात आतंकवादी कारवाया केल्या आणि तो पळून पाकिस्तानला गेला, तर आम्ही त्याला पाकिस्तानमध्ये घुसून मारू, असे प्रत्युत्तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांनी ‘द गार्डियन’मधील भारताच्या संदर्भातील लेखावरून विचारलेल्या प्रश्नावर दिले.
सिंह पुढे म्हणाले की, भारताची शक्ती किती आहे, हे आता पाकिस्तानलाही समजले आहे. भारत आपल्या शेजार्यांबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही इतिहासाची पाने चाळून पाहिल्यास तुम्हाला कळेल की, आजतागायत भारताने कुठल्याही देशावर आक्रमण केलेले नाही अथवा तसा कधी प्रयत्नही केलेला नाही. भारताने जगातल्या कोणत्याही देशाच्या एक इंच भूमीवरही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला नाही; (भारताच्या भूमीवर शत्रूंनी मिळवलेले नियंत्रण हटवून ती भूमी परत घेण्याचाही भारताने प्रयत्न केलेला नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे ! – संपादक) परंतु भारताकडे कुणी डोळे वटारले, भारतात आतंकवादी कारवाया केल्या, तर त्यांची गय केली जाणार नाही !
संपादकीय भूमिकाकॅनडा, अमेरिका आणि आता ब्रिटनमधील वर्तमानपत्र यांद्वारे भारताला जाणीवपूर्वक अशा प्रकारे लक्ष्य केले जात आहे. याद्वारे हे पाश्चात्त्य देश भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिहादी आणि खलिस्तानी आतंकवादी यांना अप्रत्यक्ष समर्थनही ते देत आहेत, हे लक्षात घेऊन अशा देशांच्या विरोधात भारताने कठोर होणे आवश्यक ! |