Largest Ocean Found : पृथ्वीच्या ७०० कि.मी. खाली सर्वांत मोठा महासागर ! – संशोधकांचा दावा

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ७०० किलोमीटर खाली सर्वांत मोठा महासागर आहे.  त्यात सर्व महासागरांच्या एकूण पाण्यापेक्षा तिप्पट पाणी आहे. पृथ्वीवर पाणी कुठून आले, याचा शोध घेत असतांना शास्त्रज्ञांना या महासागराची माहिती मिळाली.

(सौजन्य : WION)

१. शोध पथकाचे शास्त्रज्ञ स्टीव्ह जेकबसन यांनी सांगितले की, हा महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली एका निळ्या खडकात लपलेला आहे. हा खडक एका स्पंजसारखा आहे, जो पाणी शोषून घेतो. २ सहस्र ‘सिस्मोमीटर’द्वारे (भूकंपाच्या लहरींमुळे निर्माण झालेल्या भूमीच्या हालचालींची नोंद करणार्‍या यंत्राद्वारे) ५०० भूकंपांचा अभ्यास केल्यानंतर या महासागराचा शोध लागला आहे. पृथ्वीखाली उठणार्‍या लाटा ओलसर खडकावरून गेल्यावर त्यांचा वेग मंदावतो. सिस्मोमीटरद्वारे या लहरींचा अभ्यास केल्यानंतर समुद्राचा शोध लागला. हा महासागर पृथ्वीच्या खाली राहणे आवश्यक आहे; कारण जर ते पृष्ठभागाच्या बाहेर आले तर पृथ्वीवर फक्त पाणीच असेल. जमिनीच्या नावावर केवळ पर्वतांची उंच शिखरे टिकून राहतील.

२. धूमकेतू पृथ्वीवर आदळल्यानंतर त्याच्या आघातामुळे पाणी निर्माण झाल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे.