Goa High Temperature : उन्हाळी गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी गोव्यात आरोग्य संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना

पणजी : आरोग्य सेवा संचालनालयाने उन्हाळ्यात गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सावधानता सूचना जारी केल्या आहेत. सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

१. तहान लागली नसली, तरीही शक्य असेल, तेव्हा पुरेसे पाणी पिऊन शरिरातील पाण्याची पातळी नियमित ठेवा. प्रवास करतांना पिण्याचे पाणी प्यावे, पुनर्जलीकरण पेय (ओआरएस) वापरणे आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस प्यावे; अल्प प्रमाणात मिठाचे सेवन करावे; मोसमी फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात खाव्या; खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर आणि भाज्या यांसारखे पाण्याचे प्रमाण राखणारे पदार्थ खावेत.

२. पातळ, सैल, सुती कपडे शक्यतो हलक्या रंगाचे परिधान करून थेट सूर्यप्रकाशात जातांना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपरिक वस्त्र वापरून डोके झाकून ठेवा आणि उन्हात बाहेर जातांना बूट किंवा पादत्राणे घाला.

३. रेडिओ, टीव्ही, स्थानिक वर्तमानपत्रे यांद्वारे हवामानाविषयी माहिती घेऊन सतर्क रहा, तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) संकेतस्थळ https://mausam.imd.gov.in/ वर हवामानाची नवीन माहिती मिळवा.

४. हवेशीर आणि थंड ठिकाणी राहून, थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखून, दिवसा घरातील खिडक्या आणि पडदे बंद ठेवून शक्य तितक्या सावलीत रहा. खिडक्या रात्रीच्या वेळी उघडून थंड हवा येऊ द्या. सकाळी आणि संध्याकाळी बाहेरील कार्याचे नियोजन करा. कुणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना इतरांपेक्षा अधिक धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष दिले पाहिजे. यामध्ये लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती स्त्रिया, मानसिक आजार आणि शारीरिकदृष्ट्या आजारी असलेले लोक, विशेषत: हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असलेले लोक यांचा समावेश होतो.